युक्रेनसोबतच्या युद्धापासून रशियाने युरोपियन देशांना हैराण करण्यासाठी एक नवी युक्ती वापरण्यास सुरुवात केली आहे. रशियाच्या या हायब्रीड हल्ल्याने आता थेट युरोपातील उच्चपदस्थ नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. स्पेनच्या संरक्षण मंत्री मार्गारीटा रोबल्स यांचा लिथुआनियाला जाणारा लष्करी विमान रशियाच्या कलिनिनग्राडजवळ असताना त्याचे जीपीएस सिस्टिम अचानक बंद पडले. या घटनेने युरोपात खळबळ उडाली असून रशियाच्या या धोरणाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
नेमकी काय आहे ही घटना?
बुधवारी स्पेनच्या संरक्षण मंत्री मार्गारीटा रोबल्स त्यांच्या लष्करी विमानातून लिथुआनियाला निघाल्या होत्या. विमानाच्या प्रवासादरम्यान त्या रशियाच्या कलिनिनग्राड परिसराजवळ पोहोचल्या असता अचानक त्यांच्या विमानाचे जीपीएस सिस्टिम काम करणे बंद झाले. स्पॅनिश अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलिनिनग्राडजवळ अशा प्रकारच्या जीपीएसमध्ये बिघाड होणे आता सामान्य झाले आहे. यापूर्वी सप्टेंबरच्या सुरुवातीला युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्यासोबतही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी त्यांच्या विमानाला सुरक्षित लँडिंगसाठी पायलटला नकाशा आणि बॅकअप सिस्टिमचा वापर करावा लागला होता.
रशियावर थेट आरोप
जीपीएस बिघाडाच्या या घटनांनंतर युरोपियन युनियनने थेट रशियाला दोषी ठरवले आहे. युक्रेन युद्धानंतर ब्लॅक सी, बाल्टिक सी आणि पूर्व युरोपजवळील अनेक भागात अशा घटना वाढल्या आहेत. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, २०२५ च्या पहिल्या चार महिन्यांत रशियाच्या कृतीमुळे १ लाख २३ हजार विमानांना समस्यांना तोंड द्यावे लागले. स्वीडिश अधिकाऱ्यांनी तर सांगितले की, केवळ एप्रिल महिन्यात या भागात २७.४% उड्डाणांमध्ये अडथळे आले आणि त्यामागे रशियाच होता.
जीपीएस जॅमिंग म्हणजे काय?
जीपीएस सिग्नल उपग्रहांद्वारे एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर पाठवले जातात. जमिनीवर असलेले रिसीव्हर्स हे सिग्नल पकडून ठिकाणाची माहिती देतात. पण, जेव्हा एखादी व्यक्ती किंवा उपकरण त्याच फ्रिक्वेन्सीवर त्यापेक्षा जास्त तीव्र सिग्नल पाठवते, तेव्हा मूळ जीपीएस सिग्नल दबले जातात. यालाच जीपीएस जॅमिंग म्हणतात. यामुळे रिसीव्हर सिग्नल गमावून बसतो किंवा चुकीचे ठिकाण दाखवू लागतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, एखाद्या मोठ्या आवाजात गाणं सुरू असताना, दुसरा मोठा आवाज त्या गाण्याला दाबून टाकतो, तशाच प्रकारे हे काम करते.
पुढील मार्ग आणि चिंता
तज्ज्ञांच्या मते, रशिया युरोपातील देशांमध्ये गोंधळ आणि भीती निर्माण करण्यासाठी अशा कारवाया करत आहे. स्वीडिश एव्हिएशन विभागाचे प्रमुख अँड्रियास होल्मग्रेन यांनी ही स्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. जीपीएस जॅमिंग उपकरणे स्वस्त असली तरी, बहुतेक देशांमध्ये ती वापरणे बेकायदेशीर आहे. अशा घटनांमुळे विमानांच्या सुरक्षिततेवर मोठा धोका निर्माण झाला असून, भविष्यात युरोपातील हवाई वाहतुकीसाठी हे एक मोठे आव्हान ठरू शकते.