रशियन लोकांना आता तुर्कस्तान आवडेनासा झाला आहे. गेल्या दोन वर्षात तुर्कस्तानातील रशियन नागरिकांची लोकसंख्या दुपटीहून कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. २०२३मध्ये तुर्कस्तानात तब्बल १,५४,००० लोक राहत होते. तर आता हा आकडा कमी होऊन २०२५मध्ये जवळपास ८५,००० आला आहे. ही माहिती रशिया समर्थक वृत्तपत्र इझवेस्टियाने अंकारा येथील रशियन दूतावासाचा हवाला देत दिली आहे.
युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पुतिन यांनी तुर्कस्तानचा दौरा केला होता. मात्र, आता इथले रशियन लोक तुर्कस्तान सोडून जात असून, इतर देशांमध्ये स्थायिक होत आहेत. यातील काही लोक आपल्या मायदेशी म्हणजेच रशियाला परतले आहेत. तर, काही लोक सर्बिया, पोर्तुगाल, स्पेन आणि जॉर्जियामध्ये गेले आहेत.पण, रशियन लोकांनी तुर्कीमधून काढता पाय घेण्याचे कारण तरी काय? लोकांना अचानक तुर्की का आवडेनासा झाला आहे?
रशियन लोक का सोडत आहेत तुर्की?रशियन लोक तुर्की सोडत असल्याचे पहिले कारण म्हणजे महागाई. तुर्कीमध्ये महागाई ३३%च्या जवळ पोहोचली आहे. एका वर्षात घरांच्या किमती ३०% पेक्षा जास्त वाढल्या आहेत. यासोबतच, अनेक लोकांचे घर असले किंवा वर्षानुवर्षे तिथे राहत असले तरीही, त्यांना निवास परवान्याचे नूतनीकरण मिळत नाही. काही भागात, परदेशी लोकांना घर खरेदी करण्यास किंवा भाड्याने देण्यास मनाई आहे.
परदेशी लोकांवरील कर वाढले आहेत आणि इमिग्रेशन नियम अधिक कडक झाले आहेत. ऑगस्ट २०२४ पासून तुर्की पर्यटकांना तात्पुरते परवाने देणे बंद करेल. याशिवाय, सार्वजनिक सेवांमध्ये बिघाड, रुग्णालयांमध्ये दीर्घकाळ वाट पाहणे, सार्वजनिक ठिकाणी घाण आणि धूम्रपान यासारख्या समस्यांमुळे लोक त्रस्त आहेत.
युद्धापूर्वी आणि नंतर स्थलांतरितांची संख्याफेब्रुवारी २०२२मध्ये युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियामधून होणाऱ्या स्थलांतराच्या वर्णन द इकॉनॉमिस्टने १९२० नंतर देशातील सर्वात मोठे सामूहिक स्थलांतर असे केले आहे. म्हणजेच २०२२ पासून आतापर्यंत रशिया सोडणाऱ्या लोकांची ही लाट १९२० नंतरची सर्वात मोठी आहे. रशियन सरकारी सांख्यिकी संस्था रोसस्टॅटच्या मते, युद्धापूर्वी पुतिन सत्तेवर आल्यापासून १.६ दशलक्ष ते २० लाख लोकांनी देश सोडला होता आणि आक्रमणानंतर या संख्येच्या जवळपास निम्म्याने देश सोडला आहे. सर्बिया, कझाकस्तान, आर्मेनिया, तुर्की, इस्रायल, युरोप आणि अमेरिका या सर्वांनी लाखो रशियन स्थलांतरितांना आपल्या देशात घेतले आहे.