जवळपास तीन वर्ष लोटली तरी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आहे. दोन्ही देश हरप्रकारे एकमेकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, रशियाने एका कथित युक्रेनी महिला गुप्तहेराला पकडले आहे. एका युक्रेनियन महिला पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन महिलेला रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करण्यासाठी पाठवण्यात आले होते, असा दावा रशियाने केला आहे.
रशियाची संरक्षण संस्था असलेल्या एफएसबीने चार महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये ४१ वर्षीय युलिया लेमेशचेंको हिचाही समावेश आहे. रशियन गुप्तहेर यंत्रणा युक्रेनियन हेरांविरोधात सातत्याने कारवाई करत आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार युलिया लेमेशचेंको हिने आपण गुप्तहेर असल्याचे मान्य केले आहे. मात्र हा कबुलीजबाब दबावाखाली घेण्यात आल्याचा दावा केला जात आहे. एका व्हिडीओमध्ये ती सांगते की, मला एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करण्याचे आदेश दिले गेले होते. त्यासाठी २०२४ मध्ये मी इथे आले होते.
दरम्यान, रशियाच्या गुप्तहेर संघटनेने केलेल्या दाव्यानुसार, लेमेशचेंको आणि इतर ३ महिला एजंटांना बंदूक चालवण्याचं, बॉम्बस्फोट करण्याच, ड्रोन कंट्रोल करण्याचं आणि देखरेखीचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. मात्र या दाव्यांना दुजोरा देणारे पुरावे एफएसबीने सादर केलेले नाहीत. उल्लेखनीय बाब म्हणजे लेमेशचेंको हिच्याकडे रशियाचा पासपोर्ट होता. आपण २०२३ मध्ये युक्रेनच्या सुरक्षा दलामध्ये दाखल झाल्याचेही लेमेशचेंको हिने सांगितले आहे.
ओपन पॉवरलिफ्टिंग संकेतस्थळावरील माहितीनुसार लेमेशचेंको हिने युक्रेनी क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये १३० किलोग्रॅम, ७७.५ किलोग्रॅम आणि १७० किलोग्रॅम एवढं वजन उसललं होतं. क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२१ मद्ये तिने तीन सुवर्णपदकं जिंकली होती. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एका अन्य महिला एजंटला कथितपणे दोन वर्षांपूर्वी दाखल कऱण्यात आले होते. तसेच एक हत्या घडवण्यासाठी रोस्तोव्ह ऑन डॉन येथे तैनात करण्यात आले होते. आणखी एका महिलेकडे रशियन अधिकाऱ्यांची हेरगिरी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.