मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत सध्या जागतिक राजकारणात प्रचंड हालचाली सुरू आहेत. इराणकडे असलेल्या ४४० किलो समृद्ध युरेनियमवर आता रशिया आणि तुर्की या दोन्ही देशांनी डोळा ठेवला आहे. हे युरेनियम इतके घातक आहे की, त्यातून किमान ४० अण्वस्त्रे तयार केली जाऊ शकतात. या साठ्याचं भवितव्य काय असेल, याचा निर्णय शुक्रवारी होणाऱ्या अमेरिका-इराण बैठकीत होण्याची शक्यता आहे.
काय आहे हे युरेनियमचे गणित?
अण्वस्त्र सज्जतेसाठी युरेनियमचे संवर्धन करणे आवश्यक असते. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या मते, इराणकडे सध्या ६० टक्क्यांपर्यंत संवर्धित केलेले ४४० किलो युरेनियम आहे. अणुबॉम्ब बनवण्यासाठी साधारण १० किलो युरेनियम लागते. जर इराणने हे संवर्धन ७० टक्क्यांच्या पुढे नेले, तर तो देश अण्वस्त्रधारी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. विशेष म्हणजे, जून २०२५ मध्ये अमेरिकेने बी-२ बॉम्बरच्या साहाय्याने हा साठा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी ठरला.
रशिया की तुर्की: कोणाचे पारडे जड?
इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करारासाठी चर्चा सुरू होत असतानाच, हा युरेनियमचा साठा सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. रशिया इराणचा जुना मित्र आहे. मॉस्कोने स्पष्ट केले आहे की, त्यांची तेहरानसोबत चर्चा सुरू असून सर्व युरेनियम रशियात हलवले जाऊ शकते. अमेरिकेचा दबाव वाढल्यास इराण आपला साठा रशियाकडे सोपवू शकतो.
दुसरीकडे, तुर्कीनेही हा साठा आपल्याकडे ठेवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, तुर्कीकडे स्वतःची अण्वस्त्रे नाहीत. तसेच अमेरिका आणि रशिया या दोघांचाही तुर्कीवर पूर्ण विश्वास नसल्याने, त्यांच्याकडे हा साठा जाण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे.
शुक्रवारच्या बैठकीकडे जगाचे लक्ष
शुक्रवारी तुर्कीची राजधानी अंकारा येथे अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची भेट होणार आहे. या बैठकीत अमेरिका इराणला आपले प्रॉक्सी गट संपवण्यास आणि अणू कार्यक्रम रोखण्यास सांगणार आहे. त्याबदल्यात इराण आपल्यावरील जागतिक निर्बंध उठवण्याची मागणी करण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, जर चर्चेतून तोडगा निघाला नाही, तर इराणवर लष्करी कारवाई किंवा हल्ला केला जाऊ शकतो. यामुळे इराण आता युरेनियमच्या मुद्द्यावर नमती भूमिका घेतो की रशियाची साथ घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Iran's enriched uranium stockpile sparks international concern. Russia and Turkey vie for control as the US proposes a plan during upcoming talks to curb Iran's nuclear program, potentially averting military action.
Web Summary : ईरान के समृद्ध यूरेनियम भंडार ने अंतर्राष्ट्रीय चिंता बढ़ा दी है। रूस और तुर्की नियंत्रण के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं, जबकि अमेरिका ईरान के परमाणु कार्यक्रम को रोकने के लिए आगामी वार्ता में एक योजना प्रस्तावित करता है, जिससे संभावित सैन्य कार्रवाई टाली जा सकती है।