पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी सध्या अदियाला तुरुंगात आहेत. त्यांच्या तुरुंगातील आयुष्याबद्दल अनेक चर्चा सुरू असतानाच बुशरा यांची बहीण मरियम रियाझ वट्टू यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. मरियम यांच्या दाव्यानुसार, बुशरा यांना तुरुंगात अत्यंत वाईट परिस्थितीत ठेवले आहे आणि यामुळे त्यांची तब्येत खूप बिघडली आहे.
मरियम यांनी सांगितले की, बुशरा यांना भेटण्यासाठी कुटुंबीयांना खूप वेळ वाट पाहावी लागली. तसेच, अनेक वेळा विनंती केल्यानंतरच त्यांना भेटण्याची परवानगी मिळते.
"छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते"एआरवाय न्यूजशी बोलताना मरियम यांनी सांगितले की, "बुशरा यांना अत्यंत वाईट आणि बेकायदेशीर परिस्थितीत ठेवले आहे. त्यांच्या कोठडीची छत गळते, विजेच्या बोर्डमध्ये करंट येतो, कोठडीत उंदीर फिरतात आणि गेल्या दोन दिवसांपासून वीजही नाही."
मरियम यांनी पुढे सांगितले की, "एक महिन्यापेक्षा जास्त काळ वारंवार विनंती केल्यानंतर बुशरा यांना कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी मिळाली. एवढेच नाही, तर कुटुंबीयांना तुरुंगाबाहेर अनेक तास वाट पाहावी लागली."
बुशरा यांचे १५ किलो वजन घटले!मरियम यांच्या माहितीनुसार, बुशरा यांची तब्येत खूपच खालावली आहे. त्यांचे वजन १५ किलोने कमी झाले असून, त्या खूप अशक्त झाल्या आहेत, पण त्यांचे मनोबल अजूनही मजबूत आहे. त्यांनी हेही सांगितले की, बुशरा यांना अनेक प्रकरणांमध्ये जामीन मिळालेला नाही आणि त्यांना त्यांचे पती इमरान खान यांना भेटण्याची परवानगीही दिली जात नाहीये.
इमरान आणि बुशरा दोघेही भ्रष्टाचार आणि इतर अनेक प्रकरणांमध्ये तुरुंगात आहेत. २०२३मध्ये अटक झाल्यापासून, इमरान खान सातत्याने आपण निर्दोष असल्याचा दावा करत आहेत. त्यांच्या मते, विरोधकांनी त्यांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी हे आरोप आणि बनाव रचले आहेत.