लंडन: कोरोनामुळे आतापर्यंत ब्रिटनमध्ये १२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णांचा आकडा ९३ हजारांपेक्षा अधिक आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची बाधा झाल्यानं ते काही दिवस रुग्णालयात होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. या परिस्थितीत मूळ भारतीय वंशाचे असलेल्या ऋषी सुनक यांनी ब्रिटनमधील परिस्थिती हाताळली. जॉन्सन रुग्णालयात असताना सुनक यांच्यावर मोठी जबाबदारी होती. आता जॉन्सन यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतरही सुनक महत्त्वाच्या कामांवर लक्ष देत आहेत. कोरोनाचं वाढतं संकट आणि त्यामुळे अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था अशा परिस्थितीत सुनक काम करत आहेत.अर्थमंत्री असलेल्या ऋषी सुनक यांनी देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मंगळवारी मोठ्या आर्थिक घोषणा केल्या. त्यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी १४ बिलियन पाऊंड्सचा आपत्कालीन निधी जाहीर केला. राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएसएस) आणि स्थानिक प्रशासनासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. सौनक यांनी जाहीर केलेल्या १४ बिलियन पाऊंड्सपैकी ६ बिलियन पाऊंड्स आरोग्य सेवा, रुग्णालयातील बेड, व्हेटिलेचर्स आणि सुरक्षा उपकरणांवर खर्च केले जातील. तर १.६ बिलियन पाऊंड्स स्थानिक प्रशासनावर खर्च होतील.ऋषी सुनक इन्फोसिसचे माजी चेअरमन नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. त्यांनी यॉर्कशायरच्या रिचमंडचे संसदेत प्रतिनिधीत्व केलं आहे. २०१५ मध्ये ते प्रथम संसदेत निवडून गेले. ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या भूमिकेचं त्यांनी समर्थन केलं होतं. ब्रेक्झिटचा मोठा फायदा ब्रिटनमधल्या लहान उद्योगांना होईल, असं त्यांचं मत आहे. अर्थ मंत्रालयाची जबाबदारी खांद्यावर घेण्यापूर्वी त्यांनी अतिशय महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
CoronaVirus: अर्थव्यवस्था संकटात, देश आजारी; भारतीय वंशाच्या व्यक्तीने सांभाळली ब्रिटनची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 16:44 IST