१३ वर्षाच्या शुभमने तयार केला स्वस्तातला ब्रेल प्रिंटर
By Admin | Updated: January 20, 2015 20:50 IST2015-01-20T20:50:30+5:302015-01-20T20:50:30+5:30
कॅलिफोर्नियात राहणा-या १३ वर्षाच्या शुभम बॅनर्जी या भारतीय वंशाच्या मुलाने ब्रेल प्रिंटर तयार केला असून शुभमच्या या कामाची दखल सॉफ्टवेअर क्षेत्रातील ख्यातनाम कंपनी इंटेल कॉर्पनेही घेतली आहे.
१३ वर्षाच्या शुभमने तयार केला स्वस्तातला ब्रेल प्रिंटर
ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. २० - कॅलिफोर्नियात राहणा-या १३ वर्षाच्या शुभम बॅनर्जी या भारतीय वंशाच्या मुलाने ब्रेल प्रिंटर तयार केला असून शुभमच्या या कामाची दखल सॉफ्टवेअर क्षेत्रातील ख्यातनाम कंपनी इंटेल कॉर्पनेही घेतली आहे. इंटेलने शुभमच्या ब्रेगो लॅब्स या कंपनीमध्ये गुंतवणूकही केली आहे.
कॅलिफोर्नियात राहणारा शुभम बॅनर्जी हा आठवीत शिकतो. काही महिन्यांपूर्वी शुभमने त्याचे वडिल निलॉय बॅनर्जी यांना अंध व्यक्ती कसे वाचतात असा प्रश्न विचारला. यावर निलॉय यांनी त्याला गुगलवर सर्च करुन माहिती काढ असे सांगितले. वडिलांनी सांगितल्यावर शुभमने ऑनलाइन माहिती घेतली. अंधांसाठीचे ब्रेल प्रिंटर अत्यंत महाग असून बहुसंख्य अंधांना ते विकत घेणे शक्य नाही हे त्याच्या लक्षात आले. यानंतर शुभमने ब्रेल प्रिंटर तयार करण्याचा निर्धार केला. विशेष म्हणजे शुभमने हे अवघड आव्हान सहज पेलले आणि गेल्या वर्षी शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात त्याने ब्रेल प्रिंटर मांडला. ब्रेल प्रिंटरसाठी शुभमने ब्रेगो ही कंपनीही स्थापन केली आहे. ब्रेल आणि लेगो यावरुन ब्रेगो हे नाव देण्यात आले आहे.
शुभमला अंधांना ३५० डॉलर्समध्ये (सुमारे २१ हजार रुपये) ब्रेल प्रिंटर उपलब्ध करुन द्यायचा आहे. आम्ही तयार केलेला प्रिंटर जास्तीत जास्त अंध व्यक्तींना वापरता यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे शुभम आत्मविश्वासाने सांगतो. शुभमच्या ब्रेगोमध्ये आता इंटेल कॉर्पनेही गुंतवणूक केल्याने वयाच्या १३ वर्षी शुभम ब्रेगो लॅब्सचा सीईओ बनला आहे. आम्हाला शुभम अभिमान असल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईवडिलांनी दिली.