ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 27 - पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी सिक्कीममध्ये भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर चीननं भारतावर कुरघोडी करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय लष्करानं चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा उलटा कांगावा चीननं सुरू केला आहे. चीननं सिक्कीममध्ये नियंत्रण रेषेच्या वादाला भारत जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. भारतानं सिक्कीममधल्या नियंत्रण रेषेवरील लष्कर हटवावं, सीमेपलीकडे गेलेल्या भारतीय जवानांना भारतानं स्वतःच्या हद्दीत परत बोलवावं, असं आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. भारत आणि चीनच्या सीमेवर शांतता प्रस्थापित होणं गरजेचं आहे. भारत सरकारनं याला गांभीर्यानं घ्यावं आणि सीमापार धाडलेल्या जवानांना परत भारतात येण्यास सांगावं. भारतानं चीनच्या विभागीय सीमेचा आदर करावा, असंही आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. तत्पूर्वी भारतीय लष्करानं भारत आणि चीनच्या सीमाभागावर सिक्कीमजवळ चीनला रस्ता बनवण्यास रोखलं होतं. सिक्कीममधला डोका ला हा भाग चीन स्वतःचा असल्याचा दावा करतो. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी सिक्कीममध्ये घुसखोरी करून भारतात प्रवेश केला होता. सीमेचे संरक्षण करणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांशी त्यांची धक्काबुक्कीही झाली होती. चिनी सैनिकांनी भारतीय जवानांचे दोन बंकरही नष्ट केले होते. सिक्कीमच्या डोका ला भागात गेले 10 दिवस चीनची ही आगळीक सुरू आहे. चिनी सैनिकांनी कैलास मानसरोवर यात्रेला निघालेली भारतीय यात्रेकरूंची एक तुकडीही अडवून ठेवली होती. चिनी सैनिकांना भारतीय हद्दीत आणखी आतपर्यंत येण्यापासून रोखण्यासाठी भारतीय लष्कराला निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. डोका ला हे ठिकाण सिक्कीम, भूतान आणि तिबेटच्या सीमा जेथे एकत्र मिळतात त्या ठिकाणी आहे. चिनी सैनिकांनी येथे सीमा ओलांडून अतिक्रमण करण्याची ही पहिलीच वेळ नाही. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी भारतीय लष्करानं मानवी साखळी तयार करून चिनी घुसखोरांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला होता. ह्यपीएलएह्णच्या काही सैनिकांनी या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले होते आणि काही छायाचित्रेही काढली होती. याच घटनेत डोका ला भागातील लालटेन येथील दोन बंकर उद्ध्वस्त केले गेले. दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची 20 जून रोजी ध्वजबैठकही झाली. तरीही तणाव निवळलेला नाही.
सीमेवरून लष्कर हटवा अन्यथा मानसरोवरचा रस्ता बंद, चीनची भारताला धमकी
By admin | Updated: June 27, 2017 16:01 IST