भारतात परदेशी गुंतवणूकदारांसाठी रेडटेपऐवजी रेड कार्पेट - मोदी
By Admin | Updated: September 2, 2014 16:32 IST2014-09-02T16:29:44+5:302014-09-02T16:32:05+5:30
भारतात आता परदेशी गुंतवणुकदारांसाठी रेड टेपऐवजी रेड कार्पेटची निती आली असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील उद्योग जगतासाठी 'मेक इन इंडिया' असा नारा दिला आहे.
भारतात परदेशी गुंतवणूकदारांसाठी रेडटेपऐवजी रेड कार्पेट - मोदी
ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. २ - भारतात आता परदेशी गुंतवणुकदारांसाठी रेड टेपऐवजी रेड कार्पेटची निती आली असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील उद्योग जगतासाठी 'मेक इन इंडिया' असा नारा दिला आहे. अल्प गुंतवणुकीत उत्पादन सुरु करण्यासाठी भारतापेक्षा चांगली जागा कुठेही नाही असेही मोदींनी म्हटले आहे.
जपान दौ-याच्या चौथ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या उद्योग जगताला संबोधित केले. भारत आणि जपान एकमेकांना पूरक असून भारतातील 'सॉफ्टवेअर' जपानच्या 'हार्डवेअर'शी मिळाल्यास नवीन चमत्कार घडू शकतात असे नरेंद्र मोदींनी सांगितले. भारतातील ५० शहरांना मेट्रो ट्रेन हवी आहे, यावरुन भारतात गुंतवणुकीची संधी किती आहे हे समजते असे त्यांनी नमूद केले. उत्पादन मूल्य वाढत असल्याने जागतिक बाजारपेठेत जपानसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. जपानी उद्योजक जपानमध्ये राहून १० वर्षात जो पल्ला गाठतील तो पल्ला भारतात उत्पादन प्रक्रिया सुरु केल्यास दोन वर्षातच गाठता येईल. जपानी उद्योजकांनी भारतीय तरुणांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देऊन भारतामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात असेही मोदींनी सांगितले.