हल्ल्यानंतरच्या चार्ली हेब्दोच्या पहिल्याच अंकाची विक्रमी विक्री
By Admin | Updated: January 14, 2015 18:26 IST2015-01-14T18:26:30+5:302015-01-14T18:26:30+5:30
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरच पहिलाच अंक आज ३० लाख प्रतींचा छापण्यात आला. आख्या फ्रान्समध्ये काही मिनिटींमध्येच हा अंक खपला असून आणखी २० लाख प्रती छापण्यात येणार आहेत
हल्ल्यानंतरच्या चार्ली हेब्दोच्या पहिल्याच अंकाची विक्रमी विक्री
ऑनलाइन लोकमत
पॅरीस, दि. १४ - चार्ली हेब्दो या मासिकाने पॅरीसमधल्या कार्यालयावर झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर एका आठवड्यातच विक्रीचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. एरवी या उपहासात्मक साप्ताहिकाची आवृत्ती ६०,००० अंकाची निघत असते. परंतु गेल्या आठवड्यात इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरच पहिलाच अंक आज ३० लाख प्रतींचा छापण्यात आला. आख्या फ्रान्समध्ये काही मिनिटींमध्येच हा अंक खपला असून आणखी २० लाख प्रती छापण्यात येणार आहेत. हा अंक सहा भाषांमध्ये छापण्यात आला आणि त्याचे वितरण आंतरराष्ट्रीय पातळीवरही करण्यात आल्याचे वृत्त फ्रेंच प्रसारमाध्यमांनी दिले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पोलीस व पत्रकारांसह १७ जणांनी प्राण गमावले होते.
चार्ली हेब्दोने प्रेषित मोहम्मदांची खिल्ली उडवणारी व्यंगचित्रे वारंवार छापली होती. त्याचा बदला घेण्यासाठी इस्लामी दहशतवाद्यांनी चार्लीच्या कार्यालयात घुसून आठ पत्रकारांना गोळ्या गालून ठार केले तर वाटेत आलेल्या पोलीसांनाही मारले. तीन दहशतवादी पोलीसांच्या कारवाईत ठार झाले असले तरी, एक महिला दहशतवादी फरार झाली आहे. दरम्यान, मी आहे चार्ली अशी चार्ली हेब्दोला पाठिंबा देणारी निदर्शने युरोपमध्ये करण्यात आली, ज्याला लाखोंच्या संख्येने पाठिंबा दिला. तसेच फ्रान्स सरकारनेही दहशतवादाविरोधातील कायदा आणखी कडक करण्याचे संकेत दिले आहेत.
येमेनमधल्या अल कायदाने पॅरीसमधल्या दहशतवादी कृत्याची जबाबदारी घेतल्याचे वृत्त आहे.