राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला त्यांच्याच घरात फटकारलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 17:49 IST2016-08-04T15:35:34+5:302016-08-04T17:49:53+5:30
हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वानीला शहीद घोषित केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला चांगलंच फटकारलं

राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला त्यांच्याच घरात फटकारलं
>ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद, दि. 04 - हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वानीला शहीद घोषित केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला चांगलंच फटकारलं. दहशतवाद्यांचं शहीद म्हणून उदात्तीकरण करु नये असं राजनाथ सिंह बोलले आहेत. इस्लामाबादमध्ये सार्क परिषदेत बोलताना राजनाथ सिंह यांनी दहशतवादावर आपली भुमिका मांडत असताना पाकिस्तानला त्यांच्याच देशात उभं राहून फटकारलं आहे.
'चांगला किंवा वाईट दहशतवाद नसतो, दहशतवाद हा दहशतवादच असतो. फक्त दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करुन फायदा नाही, तर दहशतवादाला पाठिंबा देणा-या संस्था, व्यक्ती आणि देशांविरोधातही कारवाई केली पाहिजे', असं मत राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे.
दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाणं बनलेल्या देशांना वेगळं करण्याची मागणी राजनाथ सिंह यांनी यावेळी केली. 'दहशतवाद्यांना पाठिंबा, प्रोत्साहन, मदत तसंच आश्रय देणा-यांना वेगळं केलं पाहिजे. दहशतवादाला वेगळं करण्याची गरज आहे', असं राजनाथ सिंह बोलले आहेत.
राजनाथ सिंह यांचं भाषण कव्हर करण्यास प्रसारमाध्यमांवर बंदी
राजनाथ सिंह यांचं भाषण कव्हर करण्यापासून पाकिस्तानी आणि भारतीय प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आली होती. खासगी प्रसारमाध्यमांनादेखील भाषण कव्हर करण्याची परवानगी देण्यात आली नाही.