केजीबी एजंट ते राष्ट्राध्यक्ष, व्लादिमिर पुतीन यांची चौथी टर्म सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 03:35 PM2018-05-07T15:35:22+5:302018-05-07T15:39:15+5:30

1999 साली ते रशियाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाले. त्यानंतर केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत त्यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आली. त्यावेळेस त्यांचे वय 47 वर्षे होते.

Putin sworn in as Russian president for fourth term | केजीबी एजंट ते राष्ट्राध्यक्ष, व्लादिमिर पुतीन यांची चौथी टर्म सुरु

केजीबी एजंट ते राष्ट्राध्यक्ष, व्लादिमिर पुतीन यांची चौथी टर्म सुरु

googlenewsNext

मॉस्को- गुप्तहेर संघटना केजीबीपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या आणि प्रदीर्घकाळ रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी राहाणाऱ्या व्लादिमिर पुतीन यांच्या कार्यकाळाची चौथी टर्म सुरु झाली आहे. 18 वर्षांपुर्वी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती. आता आणखी 6 वर्षे त्यांना यापदावर राहाता येणार आहे. मॉस्को येथे ग्रँड क्रेमलिन पॅलेस येथे झालेल्या सरकारी कार्यक्रमात त्यांनी चौथ्या कार्यकाळाची सूत्रे स्वीकारली.  ते २०२४ सालापर्यंत अध्यक्षपदाची धुरा वाहतील.

स्टॅलिननंतर रशियाचे अध्यक्षपद सर्वात जास्त काळ पुतीन यांनीच भूषविले आहे. अध्यक्षपदासाठी निवडणुकीत पुतीन यांच्याविरोधात सात उमेदवार होते. पुतीन यांचे कडवे टीकाकार अलेक्झी नवल्नी यांना निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती.



 

पुतीन यांना कार्यकाळासाठी निवडून येताना 76 टक्के इतकी भरघोस मते मिळाली त्यामुळे तेच पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार यावर शिक्कामोर्तब झाले. कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार पावेल ग्रुडिनिन यांना 11.8 टक्के मते मिळाली तर व्लादिमिर झिरिनोवस्की यांना 5.6 टक्के मते मिळाली.


सरकारी कार्यक्रमानंतर पुतीन म्हणाले, रशियाच्या वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी काम करणे हे माझे कर्तव्य आहे. शांतता आणि संपन्न भविष्यासाठी तसेच प्रत्येक रशियन कुटुंबाच्या कल्याणासाठी मी काम करेन. व्लादिमिर पुतीन पुर्वी केजीबीचे एजंट होते. त्यानंतर 1999 साली ते रशियाच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाले. त्यानंतर केवळ पाच महिन्यांच्या कालावधीत त्यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आली. त्यावेळेस त्यांचे वय 47 वर्षे होते. पुतीन यांच्या कार्यकाळामध्ये काही मोठे निर्णयही घेण्यात आले. युक्रेनकडून क्रायमिया हिसकावण्यामध्ये ते यशस्वी झाले तसेच सीरियाच्या बशर अल असाद यांच्यामागे ठामपणे उभे राहून त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. अमेरिका, इस्रायल आणि पर्यायाने संपूर्ण युरोपसाठी डोकेदुखीचा प्रश्न म्हणून सीरियाकडे पाहिले जाते पण पुतीन यांनी आपल्या भूमिकेत तसूभरही बदल केला नाही.


दीर्घकाळ सत्तेत राहाणारे जगातील इतर नेते

क्युबा- सर्वाधिक काळ राज्यशकट हाकणाऱ्या यादीत क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो यांचा क्रमांक सर्वात वरती लागतो. त्यांनी ४९ वर्षे सत्ता उपभोगली. २००८ साली त्यांनी सत्ता आपला भाऊ राऊल याच्याकडे सोपवली.
तैवान- तैवानचे पहिले अध्यक्ष चँग कै शैक यांनी ४७ वर्षे सत्तेत राहून दुसरा क्रमांक पटकावला आहे. ते चीनचेही राष्ट्राध्यक्ष होते. त्या कालावधीचाही यात समावेश आहे. १९७५ साली त्यांचा मृत्यू झाला.
उत्तर कोरिया- उत्तर कोरियाचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष किम इल सुंग यांनी ४६ वर्षे सत्ता उपभोगली. त्यांचा १९९४ साली मृत्यू झाला. ते आजही कोरियाचे नेते आहेत असे मानले जाते.
लिबिया- मुअम्मर गदाफी हे २०११ पर्यंत सलग ४२ वर्षे अध्यक्ष होते. बंडखोरांनी बंड केले नसते तर आणखी काही काळ ते यापदावर राहिले असते.
गॅबन- तेलसंपन्न गॅबनचे राष्ट्राध्यक्ष ओमर बोंगो ओडिंबा हे ४१ वर्षे सत्तेत होते. त्यांचा मृत्यू २००९ साली झाला.
अल्बानिया- अल्बानियाचे एन्वर होक्सा हे १९८५ साली मृत्यू होईपर्यंत ४० वर्षे सत्तेत होते.
झिम्बाम्ब्वे- रॉबर्ट मुगाबे १९८० साली सत्तेत आले ते २०१७ पर्यंत झिम्बाब्वेची सूत्रे सांभाळत होते. ३७ वर्षांनंतर त्यांना स्तता सोडावी लागली.
सध्या दीर्घकाळ सत्तेत असणारे नेते-
इक्वोटोरियल गिनी- सध्या सर्वाधीक काळ अध्यक्षपदावर राहिलेले म्हणून तिओदोरो ओबियांग न्गुएमा यांचं नाव घेतलं जातं. ते ३८ वर्षे सत्तेत आहेत. १९७९ साली त्यांनी आपल्या काकांना पदच्युत करुन सत्ता मिळवली.
कॅमेरुन- अध्यक्ष- पॉल बिया ३५ वर्षे
काँगो- अध्यक्ष डेनिस सासोऊ ३४ वर्षे (यामध्ये ५ वर्षांचा उपराष्ट्रपतीपदाचा कालखंड मोजलेला नाही.)
कंबोडिया- पंतप्रधान हुन सेन ३३ वर्षे
युगांडा- अध्यक्ष योवेरी मुसेवेनी- ३२ वर्षे
इराण- सर्वोच्च नेते अयातोल्ला खोमेनी २९ वर्षे
सुदान- अध्यक्ष ओमर अल बशीर २८ वर्षे
कजाखस्तान- अध्यक्ष नुरसुलतान नजरबायेव २८ वर्षे
चाड- अध्यक्ष इद्रिस डेबी २७ वर्षे
ताजिकिस्तान- अध्यक्ष एमोमाली राखमोन २५ वर्षे
इरिट्रिया- अध्यक्ष इसायस  अफ्वेर्की २४ वर्षे
 

Web Title: Putin sworn in as Russian president for fourth term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.