नेपाळमध्ये सोमवारपासून Gen- Z चळवळीमुळे हिंसाचार सुरू आहे. आतापर्यंत पोलिसांच्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाला. काल मंगळवारी या निदर्शनाने हिंसक वळण घेतले. संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या खाजगी निवासस्थानांना आग लावली आहे. माजी पंतप्रधानांच्या पत्नीला घरातील आगीत जिवंत जाळण्यात आले, तर अर्थमंत्र्यांना रस्त्यावर मारहाण केली. दरम्यान, आता पाकिस्तानमध्येही मोठा बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद पाकिस्तानच्या बलुचिस्तानमघ्ये करण्यात आला आहे. बलुचिस्तानमधील अनेक राजकीय पक्षांनी आज बंदची घोषणा केली.
यामुळे मोठी शहरे ओसाड दिसत आहेत आणि बाजारपेठा बंद आहेत. झोब ते ग्वादरपर्यंतचे प्रमुख महामार्ग आणि शहरे बंद आहेत. पोलिस आणि इतर सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात छापे टाकल्यामुळे हा संताप भडकला आहे. यादरम्यान अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे.सध्या पाकिस्तानी प्रशासन बलुचिस्तानमध्ये सक्रिय आहे आणि सुमारे १०० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
या लोकांना क्वेट्टाच्या सरियाब, एअरपोर्ट रोड, बायपाससह अनेक भागातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी अटक केलेल्या लोकांमध्ये बलुचिस्तान नॅशनल पार्टी, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ, अवामी नॅशनल पार्टी, नॅशनल पार्टी, जमात-ए-इस्लामी यासह अनेक पक्षांचे नेते आहेत.
क्वेट्टा व्यतिरिक्त अनेक शहरांमधून नेत्यांना अटक करण्यात आली आहे. बलुचिस्तान नॅशनलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि इतर तीन नेत्यांना सुरबमधून अटक करण्यात आली आहे. बीएनपीचे जिल्हाध्यक्ष आणि नॅशनल पार्टीच्या १४ जणांनाही मस्तांगमधून अटक करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षा दलांनी लोरालाईमधून ७ नेत्यांना अटक केली आहे.
पीटीआयच्या जिल्हा सरचिटणीसांसह १५ जणांना दुकीमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय, झियारत, कलाट, चमनसह इतर अनेक भागातून अटक झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी अनेक वरिष्ठ नेत्यांसह शेकडो लोकांना अटक केल्याचा आरोप अवामी नॅशनल पार्टीने केला आहे. याच्या निषेधार्थ हा संप आयोजित करण्यात आला आहे. अवामी नॅशनल पार्टीचे म्हणणे आहे की बलुचिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच असा यशस्वी बंद झाला आहे.