इराणविरुद्धचेयुद्ध सुरू असताना इस्रायलने मंगळवारी (१७ मार्च) एक माहिती जाहीर केली. इराण लष्करातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना मारण्यात आल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले. इस्रायलच्या पंतप्रधानांच्या एक्स अकाऊंटवरून एक फोटोही शेअर करण्यात आला. पंतप्रधान नेतन्याहू हे मारले गेल्याची चर्चा रंगलेली असतानाच हा फोटो पोस्ट करण्यात आला.
इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपवण्याचे आदेश देताना पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू, असे सांगत इस्रायलकडून एक फोटो पोस्ट करण्यात आला. या फोटोमध्ये पंतप्रधान नेतन्याहू फोनवर बोलत आहेत. त्यांच्या बाजूला एक लष्करी अधिकारी बसलेला असल्याचे दिसत आहे. दुसऱ्या बाजूला आणखी एक अधिकारी असून, तो कागदावर नोंदी घेत असल्याचे दिसत आहे.
सोलेमानी इस्रायलच्या हल्ल्यात ठार
इराणच्या बासीज दलाचे कमांडर गुलामरेझा सोलेमानी हे हल्ल्यात मारले गेले असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सेकडून त्याबद्दलची एक पोस्टही करण्यात आली आहे. सोलेमानी हे मागील सहा वर्षांपासून बासीज यूनिटचे कमांडर होते.
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांना लक्ष्य केले असल्याचा दावाही इस्रायलकडून करण्यात आला आहे. यात इस्रायकडून लारीजानी यांना मारण्यात आले आहे की, ते जखमी झाले आहेत, याबद्दल स्पष्ट माहिती दिली गेली नाहीये.