गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान जर्मनीत
By Admin | Updated: April 13, 2015 04:29 IST2015-04-13T04:29:56+5:302015-04-13T04:29:56+5:30
‘मेक इन इंडिया’ योजना यशस्वी करण्याच्या उद्देशातहत तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचा दौरा आटोपून रविवारी

गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान जर्मनीत
हॅनोव्हर : ‘मेक इन इंडिया’ योजना यशस्वी करण्याच्या उद्देशातहत तीन देशांच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचा दौरा आटोपून रविवारी हॅनोव्हर (जर्मनी) येथे दाखल झाले. येथे पोहोचताच त्यांनी जर्मनीतील प्रभावशाली उद्योगपतींची गोलमेज बैठकीत भेट घेऊन चर्चाही केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जर्मनीतील उद्योगपतींना भारतातील व्यावसायिक वातावरण सुलभ करण्याचा विश्वास दिला.
भारतातील व्यावसायिक वातावरण विदेशी कंपन्यांसाठी अधिक सोयीचे करता येईल, याबाबतही त्यांनी जर्मनीतील उद्योगपतींची मते जाणून घेतली. तसेच या उपाय-योजना अंमलात आणण्यासाठी आपण व्यक्तीश: लक्ष देत असल्याची ग्वाहीही मोदी यांनी दिली.
लांगेनहेगन विमानतळावरुन पंतप्रधान मोदी मुक्कामासाठी हॉटेलकडे रवाना झाले. त्या ठिकाणी आधीपासून अनेक भारतीय उपस्थित होते. त्यांनी मोदी ...मोदी अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनीही काही लोकांशी हस्तांदोलनही केले.
तीन दिवसांच्या जर्मनीच्या भेटीत ते जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल आणि जर्मनीतील उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. मोदी यांच्या भेटीआधीच जर्मनीतील रस्त्यांरस्त्यांवर ‘मेक इन इंडिया’चे फलक लागले होते. (वृत्तसंस्था)
हॅनोव्हर प्रदर्शनात यंदा भारतही भागीदार असून या प्रदर्शनात ४०० भारतीय कंपन्या सहभागी झाल्या आहेत. तसेच १०० ते १२० भारतीय सीईओ आणि ३ हजार जर्मन प्रतिनिधी सहभागी होत आहेत. (वृत्तसंस्था)