न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्र महासभेत मंगळवारी एक रंजक घटना पाहायला मिळाली. याठिकाणी जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीने हिंदू धर्मातील ओम शब्दाचा उल्लेख केला. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंतो यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट ओम शांती ओम असा केला. त्याशिवाय जगभरातील नेत्यांना एकत्रित येऊन काम करण्याचं आवाहनही त्यांनी केले. संयुक्त महासभेच्या ८० व्या सत्रात इस्रायल आणि पॅलेस्टाइन मुद्दा चर्चेचा विषय होता. विविध देशांच्या प्रतिनिधींनी या चर्चेत सहभाग नोंदवला. पॅलेस्टाइनला आतापर्यंत ५ देशांनी मान्यता दिली आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेत बोलताना इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंतो यांनी म्हटलं की, जागतिक शांतता, न्याय आणि समान संधी सगळ्यांना मिळायला हवी. भीती, वंशवाद, द्वेष, दडपशाही आणि रंगभेदामुळे प्रेरित मानवी मूर्खपणा आपल्या सामायिक भविष्याला धोका निर्माण करतो. गाझा येथे शांतता प्रस्थापित होण्यासाठी इंडोनेशियाची त्यांचे २० हजार सैन्य तिथे तैनात करण्याची तयारी आहे. आज इंडोनेशिया हा संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्यात सर्वात मोठा योगदान देणारा देश आहे. जिथे शांततेला संरक्षणाची गरज आहे तिथे आम्ही सेवा देत राहू, फक्त शब्दांनी नाही तर जमिनीवर असलेल्या सैनिकांसह असं त्यांनी सांगितले.
प्रबोवो यांनी भाषणाची सुरुवात 'बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम' आणि 'अस्सलामु अलैकुम' सारख्या मुस्लिम अभिवादनाने केली. त्यानंतर त्यांनी अमेरिकन स्वातंत्र्य घोषणापत्रातील "सर्व माणसे समान आहेत" या तत्त्वाचा उल्लेख करून जागतिक समृद्धी आणि मानवाधिकारांच्या विकासाकडे लक्ष वेधले. इंडोनेशियाच्या वसाहतवादी काळातील दुःखद इतिहासाचा उल्लेख करताना त्यांनी यूएनच्या मदतीसाठी आभार मानले, ज्याने इंडोनेशियाला गरीबी, उपासमार आणि रोगांपासून मुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली.
दरम्यान, प्रबोवो यांच्या भाषणाचा शेवट मात्र भावनिक होता. त्यांनी विविध धर्मांच्या अभिवादनांचा समावेश करून "वस्सलामु अलैकुम वरह्मतुल्लाही वबरकातुह, शालोम, ओम शांती, शांती ओम, नमो बुद्धाय. धन्यवाद...असं म्हणत प्रबोवो यांनी मुस्लिम, ज्यू, हिंदू आणि बौद्ध धर्मांचे प्रतिनिधित्व करत होते, त्यांच्यासमोर बहुधार्मिक सद्भावनेचा संदेश दिला.