अमेरिका पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले करण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 19:27 IST2017-06-20T19:27:15+5:302017-06-20T19:27:15+5:30
अफगाणिस्तानला वारंवार लक्ष्य करणा-या पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच ट्रम्प प्रशासनाने केले आहेत.

अमेरिका पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले करण्याची शक्यता
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 20 - अफगाणिस्तानला वारंवार लक्ष्य करणा-या पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच ट्रम्प प्रशासनाने केले आहेत. पाकिस्तानकडून सीमारेषेवर अफगाणिस्तान सैन्याला करण्यात येणा-या लक्ष्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्यांत (ड्रोन) वाढ करण्याची शक्यता असून, पाकिस्तानला दिल्या जात असलेल्या आर्थिक मदतीवर गधा आणण्याची भूमिका अमेरिका घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती ट्रम्प प्रशासनातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या सुरू असलेल्या युद्धाला आता जवळपास 16 वर्षे पूर्ण झालीत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाकडून याचा पुनर्अभ्यास केला आहे. ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत अफगाण-पाक धोरणासंदर्भात सार्वजनिक चर्चा न करण्याची भूमिका पेंटागॉननं घेतली आहे. पाकिस्तान अमेरिकेचा मित्र राष्ट्र आहे. मात्र पाकमधील दहशतवादाला शेजारील देशांना त्रास होत आहे. पाकमधील दहशतवाद्यांच्या तळांसंदर्भात अमेरिकेकडून कठोर भूमिका घेतली जाण्याचे संकेतही दिले आहेत. पाकिस्तानकडून तालिबान्यांना आर्थिक रसद पुरवली जात असल्यामुळेच ते अफगाणिस्तानवर शक्तिशाली हल्ले करत असल्याचंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.