पोलिओ लसीकरण; सात पोलिसांची पाकमध्ये हत्या
By Admin | Updated: April 21, 2016 03:27 IST2016-04-21T03:27:06+5:302016-04-21T03:27:06+5:30
पाकिस्तानच्या कराची शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान सशस्त्र लोकांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करून सात पोलिसांना ठार मारले

पोलिओ लसीकरण; सात पोलिसांची पाकमध्ये हत्या
कराची : पाकिस्तानच्या कराची शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेदरम्यान सशस्त्र लोकांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करून सात पोलिसांना ठार मारले. ओरांगी येथील पोलिओ लसीकरणादरम्यान झालेल्या हल्ल्यात चार पोलीस ठार झाले, तर याच क्षेत्रात झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात आणखी तीन पोलीस मारले गेले.
चार दुचाकींवरून आलेल्या आठ जणांनी हे हल्ले घडवून आणले. आधी त्यांनी पोलिसांच्या गस्ती वाहनावर हल्ला केला व त्यानंतर पळून जाताना तीन अन्य पोलिसांना गोळ्या घातल्या.
पोलिओ लसीकरणाला पाकमधील कट्टरवाद्यांचा विरोध आहे. लसीकरणामागे इस्लामी लोकांना वंध्य करण्याचा हेतू असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यातूनच पोलिओ लसीकरणाला लक्ष्य केले जाते. आज जेथे हल्ला झाला तेथेही लसीकरण सुरू होते. मात्र, पोलीसांनी हल्ल्याचे लक्ष्य पोलिओ नाही, तर पोलीस होते, असे सांगितले. (वृत्तसंस्था)