सिडनीत पंतप्रधानांचे अभूतपूर्व स्वागत
By Admin | Updated: November 18, 2014 00:30 IST2014-11-18T00:30:05+5:302014-11-18T00:30:05+5:30
आॅस्ट्रेलियातील भारतीय नागरिकांनी भेटीला आलेल्या आपल्या पंतप्रधानांचे सोमवारी अभूतपूर्व स्वागत केले. कोणताही देश सरकारकडून चालवला जात नाही

सिडनीत पंतप्रधानांचे अभूतपूर्व स्वागत
सिडनी : आॅस्ट्रेलियातील भारतीय नागरिकांनी भेटीला आलेल्या आपल्या पंतप्रधानांचे सोमवारी अभूतपूर्व स्वागत केले. कोणताही देश सरकारकडून चालवला जात नाही, तो चालवला जातो जनतेकडून असे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले आणि जमावाने त्याचे स्वागत टाळ्यांच्या कडकडाटात केले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांची भेट घेणार असून, यावेळी दोन्ही देशादरम्यान विविध करारावर स्वाक्षरी होईल, बुधवारी पंतप्रधान फिजीला जातील.
आॅस्ट्रेलियन पर्यटकांना भारतात आल्यानंतर मिळणारा व्हिसा, तसेच अनिवासी भारतीय नागरिकांसाठी ओसीआय व पीआयओ यांचे दोन महिन्यात विलीनीकरण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. येथील आॅलिम्पिक पार्क येथे मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेल्या २० हजार भारतीय नागरिकांसमोर ते बोलत होते. भारताच्या पंतप्रधानांनी २८ वर्षांनंतर आपल्या नागरिकांशी साधलेला हा पहिला संवाद होता.
‘मोदी, मोदी’ चा जयघोष सिडनीचा आॅलिम्पिक पार्क भारून टाकत होता. या प्रेमामागे अपेक्षा आहेत हे मला माहीत आहे, तुमच्या स्वप्नातला भारत मला निर्माण करायचा आहे, असे मोदी यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. भारताने मागे का राहावे याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. आपण आपल्या खिडक्या उघडू या, ताजी हवा आत येऊ द्या, असे मोदी म्हणाले.
भारत सरकारने अनेक अनावश्यक कायदे रद्द केले आहेत, त्याचा हा उल्लेख होता. भारतीय नागरिकांनी केलेल्या अभूतपूर्व स्वागतामुळे पंतप्रधान मोदी भारावून गेले होते. हे स्वागत, हा आदर, हा उत्साह मी भारतीय जनतेला अर्पण करतो असे मोदी म्हणाले.
केंद्र सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणांचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. रेल्वे खात्यात परदेशी गुंतवणुकींची मर्यादा १०० टक्क्यांपर्यंत वाढविली आहे, आॅस्ट्रेलियातील कंपन्या रेल्वेसारख्या क्षेत्रात गुंतवणूक करतील, अशी अपेक्षा करू असेही ते म्हणाले.
स्वच्छ भारत योजनेचा उल्लेख करून देश स्वच्छ असेल तर अधिक पर्यटक येतील, असे मोदी यांनी सांगितले. या योजनेत सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले आणि ज्या खेड्यातून तुम्ही आला आहात ते गाव दत्तक घ्या, ते गाव सुधारून दाखवा,असेही मोदी म्हणाले. काही लोकांना मोठ्या गोष्टी करायला आवडतात, मला छोटी, छोटी कामे करणे आवडते, म्हणूनच शौचालये बांधणे आणि स्वच्छता करणे अशा घोषणा मी दिल्या, असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)