वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचं प्रत्यार्पण करण्याची मंजुरी ट्रम्प प्रशासनाने दिली आहे.
मोदी-ट्रम्प भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटातील सूत्रधार तहव्वुर राणा याच्या प्रत्यार्पणाला आम्ही मंजुरी देत आहोत. राणाला न्यायाचा सामना करण्यासाठी भारतात जावं लागेल असं त्यांनी सांगितले. व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आम्ही इथं आणि भारतात बराच वेळ एकत्र राहिलो आहे. ५ वर्षापूर्वी मी सुंदर देशात जाऊन आलो. तो माझ्यासाठी अविश्वसनीय काळ होता. अमेरिका आणि भारत यांच्यात विशेष नातं आहे. जगातील सर्वात जुनी आणि मोठी लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी फ्रेमवर्कची मी घोषणा करत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच तेल आणि वायू, एलएनजीच्या विक्रीने आम्ही तूट भरून काढू शकतो. पंतप्रधान मोदी आणि मी एका ऐतिहासिक ऊर्जा करारावर स्वाक्षरी केली आहे ज्यामुळे अमेरिका भारताला तेल आणि वायूचा प्रमुख पुरवठादार म्हणून पुढे येईल. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी भारतात आयात शुल्क कपात करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेची भारतासोबतची व्यापारी तूट सुमारे १०० अब्ज डॉलर्स आहे. ही तूट भरून काढण्यासाठी पुढील ४ वर्षात प्रयत्न करू असं आमच्यात ठरलं आहे. आम्हाला समान संधीचं व्यासपीठ हवं ज्याचा आम्हाला हक्क आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.
दरम्यान, या वर्षी अब्जावधी डॉलर्सच्या संरक्षण विक्रीला सुरुवात होत आहे. क्वाड आणि इंडो-पॅसिफिक मजबूत केले जातील असं ट्रम्प यांनी सांगितले तर आमच्यासाठी राष्ट्रहित सर्वोच्च आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार २०३० पर्यंत दुप्पट करू. मी सर्व भारतीयांच्या वतीने डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात येण्याचं निमंत्रण देतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
कोण आहे तहव्वूर राणा?
मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनडाचा उद्योगपती तहव्वूर राणा भारतात २००८ साली झालेल्या मुंबईत दहशतवादी हल्ल्यात प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. भारताने अमेरिकेसोबत त्याबाबत चर्चा केली. भारताचे पुरावे अमेरिकेने स्वीकार केले. २६/११ च्या हल्ल्यातही तहव्वूरची भूमिका असल्याचा उल्लेख आहे. भारत तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होता. २००८ पासून तहव्वूर राणा फरार होता. १३ नोव्हेंबरला तहव्वूर राणाने अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात रिव्यू याचिका दाखल केली होती. तहव्वूर राणा हा डेविड हेडली उर्फ दाऊद सईद गिलानीचा बालमित्र आहे.