वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या काही मिनिटांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत मोठं विधान केले आहे. ट्रम्प यांनी सर्व देशांवर जशास तसा कर लादण्याची घोषणा केली. याचा अर्थ कोणताही देश अमेरिकन आयातीवर जितके शुल्क आकारतो तितकेच आम्ही कर आकारू. ना जास्त, ना कमी असं ट्रम्प यांनी सांगितले. ते आमच्याकडून कर आकारतात तितकाच आम्ही कर आकारू हे इतके सोपे आहे असं ट्रम्प यांनी सांगितले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत मोठं विधान केले.
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत हा कुठल्याही देशापेक्षा जास्त कर घेतो. काही छोटे देश जे वास्तवात अधिक घेतात परंतु भारतात जबरदस्त टॅरिफ वसूल केले जाते. मला आठवतं, हार्ले डेविडसन भारतात त्यांची बाईक विकू शकला नाही कारण भारतात इतका जास्त कर आकारला जात होता. परंतु टॅक्स वाचवण्यासाठी हार्ले डेविडसन यांनी भारतात एक उत्पादन फॅक्टरी बनवली. हेच अमेरिकेसोबत होऊ शकते. ते याठिकाणी फॅक्टरी किंवा प्लांट अथवा जे काही असेल त्याचे उत्पादन करू शकतील मग त्यात आरोग्य, वाहने आणि सेमी कंडक्टर यांचाही समावेश असू शकतो असं त्यांनी आठवण करून दिली.
ट्रम्प - मोदी बैठकीत होऊ शकतो मोठा निर्णय
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीपूर्वीच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना टॅरिफ गिफ्ट देण्याचा प्लॅन बनवला आहे. भारतात अमेरिकेतून आयात वस्तूवर कर कमी करण्याचे संकेत आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यावसायिक भागीदारी वाढवण्यासाठी टॅरिफबाबत या भेटीत मोठ्या निर्णयाची अपेक्षा आहे. दोन्ही देश व्यापाराला चालना देण्यासाठी टॅरिफबाबत योग्य निर्णय घेऊ शकतात. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ते संयुक्तपणे माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
स्थलांतरण, व्यापाराबद्दल ट्रम्प यांच्याशी चर्चा
व्यापार, ऊर्जा, संरक्षण आणि स्थलांतरण, टॅरिफ धोरण या महत्त्वपूर्ण विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वॉशिंग्टनमध्ये तेथील भारतीयांनी जंगी स्वागत केले. त्यांनी 'भारत माता की जय', 'वन्दे मातरम'च्या घोषणा दिल्या आणि भारतीय व अमेरिकी राष्ट्रध्वज फडकवले.