PM Modi Namibia Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या परदेश दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात नामिबियाला पोहोचले आहेत. दक्षिण अमेरिकन देश असलेल्या ब्राझीलच्या चार दिवसांच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी आफ्रिकन देश नामिबियाला पोहोचले. नामिबियाला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायाची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नामिबियाच्या संसदेला संबोधित केले. यावेळी नामिबियाच्या खासदारा पंतप्रधान मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन दिलं. पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर खासदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
"लोकशाहीचे मंदिर असलेल्या या सन्माननीय सभागृहाला संबोधित करणे हा एक मोठा सन्मान आहे. मला हा सन्मान दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. लोकशाहीच्या जननीचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे आणि मी माझ्यासोबत भारतातील १.४ अब्ज लोकांकडून शुभेच्छा घेऊन आलो आहे. काही महिन्यांपूर्वी, नामिबियाने त्यांची पहिली महिला राष्ट्रपती निवडून एक ऐतिहासिक क्षण साजरा केला. आम्हाल तुमचा अभिमान आहे. भारतात आम्ही अभिमानाने आम्ही राष्ट्रपती महोदया म्हणतो. एका गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाची राष्ट्रपती आहे हे भारतीय संविधानाचे सामर्थ्य आहे. माझ्यासारख्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीला तीनदा पंतप्रधान होण्याची संधी संविधानाच्या सामर्थ्याने दिली. ज्यांच्याकडे काहीही नाही, त्यांना संविधानाची गॅरंटी आहे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
"स्वातंत्र्याच्या लढाईत भारतातील लोक नामिबियाच्या पाठीशी अभिमानाने उभे राहिले. आपल्या स्वातंत्र्यापूर्वीही भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये नैऋत्य आफ्रिकेचा मुद्दा उपस्थित केला होता. नामिबियातील संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैन्याचे नेतृत्व भारतीय लेफ्टनंट जनरल दिवाण प्रेम चंद करत होते. केवळ शब्दांतच नव्हे तर कृतीतूनही तुमच्या पाठीशी उभे राहण्याचा भारताला अभिमान आहे. आपल्या लोकांमधील मैत्रीचे प्रतीक म्हणून नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्याबद्दल मला खूप सन्मान वाटतो. नामिबियाच्या मजबूत आणि सुंदर वनस्पतींप्रमाणेच, आपली मैत्री काळाच्या कसोटीवर उतरली आहे. तुमची राष्ट्रीय वनस्पती वेल्विट्स्चिया मिराबिलिस प्रमाणे, ती अधिक मजबूत होत जावो," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
"आम्ही केवळ आमच्या भूतकाळातील संबंधांना महत्त्व देत नाही तर आमच्या सामायिक भविष्याच्या शक्यता प्रत्यक्षात आणण्यावरही लक्ष केंद्रित करतो. नामिबियाच्या व्हिजन २०३० वर एकत्र काम करण्याला आम्ही खूप महत्त्व देतो. आमचे लोक आमच्या भागीदारीच्या केंद्रस्थानी आहेत. भारतातील शिष्यवृत्ती आणि क्षमता निर्माण कार्यक्रमांचा लाभ १७०० हून अधिक नामिबियावासीयांना झाला आहे. आम्हाला आनंद आहे की नामिबिया हा भारताच्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा पहिला देश आहे. आमच्या द्विपक्षीय व्यापाराने ८०० दशलक्ष डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. पण क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे, आम्ही अजूनही तयारी करत आहोत. क्रिकेटप्रमाणे आम्ही अधिक वेगाने धावा करू," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
नामिबियाच्या संसदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोजेक्ट चीताबद्दल नामिबियाचे आभार मानले. "तुम्ही आमच्या देशात चित्ते पुन्हा आणण्यास मदत केली आहे. तुमच्या या भेटीसाठी आम्ही खूप आभारी आहोत. मला त्या चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्याचे सौभाग्य मिळाले. त्यांनी तुम्हाला सर्व काही ठीक आहे असं सांगायला सांगितले आहे. ते खूप आनंदी आहेत आणि त्यांच्या नवीन घराशी चांगले जुळवून घेतले आहे. त्यांची संख्या देखील वाढली आहे. ते भारतात त्यांचा वेळ एन्जॉय करत आहेत," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.