अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या हात धुवून मागे लागले आहेत. परंतू, कॅनडाच्या बिझनेसमनने डोनाल्ड ट्रम्प यांना हात चोळत बसावे लागेल, भारताला डिवचण्याची चूक करू नका, असा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना भारतात बनलेल्या वस्तू खरेदी करण्यास सांगितले आहे.
ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात भारतावर २५% जास्त कर आणि रशियासोबत व्यवसाय केल्याबद्दल अतिरिक्त दंडाची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. कॅनेडियन उद्योगपती आणि टेस्टबेडचे अध्यक्ष कर्क लुबिमोव्ह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (आता एक्स)वरून ट्रम्प यांना इशारा दिला आहे. ती एक मोठी भू-राजकीय चूक आहे, ज्यामुळे आशियातील अमेरिकेच्या धोरणात्मक लक्ष्यांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ट्रम्प आता जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या भारताविरुद्ध व्यापार युद्ध पुकारत आहेत. ते भू-राजकीय रणनीती अजिबात विचारात घेत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कदाचित जगातील सर्वात लोकप्रिय आहेत आणि त्यांचा अनेक प्रमुख देशांमध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे. जागतिक पुरवठा साखळीतील भारताची भूमिका चीनचे वर्चस्व कमी करण्याच्या संदर्भात पहायला हवी होती. चीनमधून उत्पादन स्थलांतर करण्यासाठी भारत हा एक नैसर्गिक पर्याय होऊ शकतो. कारण काही केल्या अमेरिका ५० सेंटला टुथब्रश बनवू शकणार नाही, अशा शब्दांत लुबिमोव्ह यांनी ट्रम्प यांना फटकारले आहे.
कॅनडाने खलिस्तानींसाठी असाच भारतासोबत पंगा घेतला होता. परंतू, अखेरीस जस्टीन ट्रुडो यांना त्यांचे पद सोडावे लागले होते. भारताने जागतिक स्तरावर चांगले संबंध तयार केले आहेत. ब्रिक्स देशांमध्येही सदस्य आहे. ब्रिक्समध्ये अमेरिकी डॉलरला डावलून आपले चलन आणण्याचाही विचार पुढे आला होता.