बँकॉक : थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने ‘फोन कॉल लीक’ प्रकरणात पंतप्रधान पेताँगतार्न शिनावात्रा यांना पदावरून निलंबित करण्याचा निकाल दिला आहे. या प्रकरणी अंतिम निकाल देईपर्यंत पंतप्रधान निलंबित राहतील. न्यायालयाने ७ विरुद्ध २ अशा बहुमताने १ जुलैपासून पंतप्रधानांना निलंबित करण्यासंबंधी हा निकाल दिला.
बंकर बस्टर बॉम्ब नेण्याची भारताकडेही क्षमता?, अग्नि-५ क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती येणार
प्रकरण काय?
मे २०२५मध्ये थायलंड व कंबोडिया दरम्यान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. यात चकमकीत कंबोडियाच्या एका जवानाचा मृत्यू झाला होता. या तणावातच पंतप्रधान शिनावात्रा यांनी कंबोडियाचे नेते व माजी पंतप्रधान हून सेन यांना फोन केला होता. हा फोन कॉल लीक झाला. यात शिनावात्रा हून सेन यांना ‘अंकल’ म्हणून संबोधित केल्याचे स्पष्ट झाले. थायलंडच्या संसदेतील ३६ खासदारांच्या गटाने पंतप्रधानांविरुद्ध याचिका दाखल केली होती.
हे आहेत आरोप
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांनी या प्रकरणात देशाची पत घालवल्याचा विरोधी खासदारांचा आरोप आहे. त्यांच्या या वागण्यामुळे थायलंडची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि लष्कराचा स्वाभिमान दुखावला गेल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
शिनावात्रांचा खुलासा
आपण जे काही केले ते संघर्ष आणि तणाव टाळण्यासाठी केल्याचे शिनावात्रा यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करून चौकशीत सर्व प्रकारे सहकार्य करू, असेही त्यांनी म्हटले आहे.