पेटंट प्रकरणी ‘अॅपलला’ न्यायालयाचा दणका
By Admin | Updated: October 18, 2015 02:00 IST2015-10-18T02:00:26+5:302015-10-18T02:00:26+5:30
पेटंटच्या उल्लंघन प्रकरणात विस्कॉन्सिन विद्यापीठाला २३.४ कोटी डॉलर देण्याचा आदेश येथील एका संघीय न्यायालयाने ‘अॅपल’च्या एका शाखेला दिला आहे.

पेटंट प्रकरणी ‘अॅपलला’ न्यायालयाचा दणका
वॉशिंग्टन : पेटंटच्या उल्लंघन प्रकरणात विस्कॉन्सिन विद्यापीठाला २३.४ कोटी डॉलर देण्याचा आदेश येथील एका संघीय न्यायालयाने ‘अॅपल’च्या एका शाखेला दिला आहे.
हे प्रकरण विद्यापीठाच्या संशोधकांनी विकसित केलेल्या मायक्रो प्रोसेसर तंत्रज्ञानाशी निगडित आहे. ते विकसित करण्यात भारतीय वंशाच्या दोन अमेरिकी नागरिकांचा मोठा वाटा होता. जिवजयकुमार व गुरिंदरसिंग सोही, अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनी राजस्थानातील बिर्ला इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स या संस्थेतून पदविका घेऊन अमेरिकेत वास्तव्य केले आहे. ‘अॅपल’ने ‘विस्कॉन्सिन अॅल्युमनी रिसर्च फाऊंडेशन’च्या पेटंटचे उल्लंघन केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. हे तंत्रज्ञान आपण विकसित केल्याचा दावा ‘अॅपल’ने केला होता. या तंत्रज्ञानाने कॉम्प्युटरची क्षमता, गती वाढते. या प्रकरणी दोन आठवडे सुनावणी झाली. त्यात अॅपलच्या ए-७, ए-८ आणि ए-८ एक्स प्रणालीच्या चिपच्या डिझाईनने या विद्यापीठाच्या पेटंटचे उल्लंघन होते, असे आढळून आले. त्यानंतरच न्यायालयाने २३.४ कोटी डॉलरची भरपाई देण्याचा आदेश दिला. या विद्यापीठातील प्रोफेसर सुरिंदरसिंह सोही म्हणाले
की, आमचे तंत्रज्ञान काळाच्या
फारच पुढे होते, तेच अॅपलने वापरले होते. (वृत्तसंस्था)