पॅरिसचे ओलीस नाट्य संपले
By Admin | Updated: January 17, 2015 03:14 IST2015-01-17T03:14:48+5:302015-01-17T03:14:48+5:30
चार्ली हेब्डो साप्ताहिकावरील हल्ल्याच्या धक्क्यातून फ्रान्स पुरता सावरण्याच्या आतच पॅरिसच्या वायव्येक डील कोलंबस पोस्ट आॅफिसमध्ये शुक्रवारी ओलीस नाट्य घडले.

पॅरिसचे ओलीस नाट्य संपले
पॅरिस : चार्ली हेब्डो साप्ताहिकावरील हल्ल्याच्या धक्क्यातून फ्रान्स पुरता सावरण्याच्या आतच पॅरिसच्या वायव्येक डील कोलंबस पोस्ट आॅफिसमध्ये शुक्रवारी ओलीस नाट्य घडले. तेथे अनेकांना ओलीस ठेवणाऱ्या सशस्त्र हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या ताब्यातील सर्व ओलिसांची सुखरूप मुक्तता करण्यात आली. सुदैवाने या ओलीस नाट्यात कोणीही जखमी झाले नाही. हे ओलीस नाट्य गेल्या आठवड्यात पॅरिस शहरात झालेल्या हल्ल्यांशी संबंधित नव्हते, असे बीएफएम टीव्हीने म्हटले आहे.
हल्लेखोराकडे ए के ४७ रायफल होती. अर्थात हा नियोजित दहशतवादी हल्ला आहे की माथेफिरूचे कृत्य आहे, हे आताच सांगता येणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. हल्लेखोराने पोस्ट आॅफिसचा ताबा घेतला तेव्हा पोस्ट आॅफिसात आलेले अनेक लोक पळून गेले. बंदूकधारी त्यांना परत बोलवत असल्याचे विलक्षण दृश्य अनेकांनी पाहिले.अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी हे पॅरिसमधील हल्यानंतर पॅरिस भेटीवर आले असून त्यांच्या दौऱ्यादरम्यान या घटना घडल्या आहेत. पॅरिसमध्ये या घडामोडी सुरू असताना जर्मनीच्या बर्लिन शहरात शुक्रवारी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. ते इस्लामिक स्टेटसाठी जिहादींची भरती करत असल्याचा आरोप आहे. त्याखेरीज बेल्जियममधील पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन संशयित दहशतवादी ठार झाले.