गोळीबार, स्फोटामुळे पॅरिस पुन्हा हादरले
By Admin | Updated: January 8, 2015 15:49 IST2015-01-08T13:54:01+5:302015-01-08T15:49:54+5:30
फ्रान्समधील मासिकाच्या कार्यालयावर बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर दक्षिण पॅरिसमध्ये गोळीबार आणि लायन शहरातील रेस्टॉरंटमधील स्फोटामुळे गुरूवारी पॅरिस पुन्हा हादरले.

गोळीबार, स्फोटामुळे पॅरिस पुन्हा हादरले
>ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. ८ - फ्रान्समधील चार्ली हेब्दो या व्यंगचित्रांच्या मासिकाच्या कार्यालयावर बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर गोळीबार आणि स्फोटांच्या घटनांमुळे मुळे गुरूवारी पॅरिस पुन्हा हादरले. दक्षिण पॅरिसमध्ये गुरुवारी पुन्हा अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला असून या हल्ल्यात दोन पोलिसांसह तीन नागरीक जखमी झाले. तर लायन उपनगरातील रेस्टॉरंटमध्ये स्फोट घडवण्यात आला. दरम्यान हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. या हल्ल्यात जकमी झालेली महिला पोलीस नंतर रुग्णालयात मरण पावल्याचे वृत्त आहे.
मात्र कालच्या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा आजच्या हल्ल्याशी संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. कालच्या हल्लेखोरांपैकी एक १८ वर्षीय हल्लेखोर पोलिसांना शरण आला असला तरीही इतर दोन हल्लेखोर अद्याप फरार असल्याने त्यांनीही हा हल्ला केला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बुधवारी सकाळी तीन सशस्त्र हल्लेखोरांनी पॅरिसच्या व्यंगात्मक व तिरकस लेखनासाठी प्रसिद्ध असणा-या डाव्या विचारांच्या साप्ताहिकाच्या हल्ला केला होता. त्यात संपादक, चार व्यंगचित्रकारांसह १२ जण ठार झाले असून सात जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पॅरिस शहरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असतानाही गुरूवारी हा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या हल्ल्यानंतर २० देशांत फ्रान्सची दूतावास व सांस्कृतिक केंद्रे बंद करण्यात आली आहेत.
दरम्यान, पॅरीसमध्ये धार्मिक तेढ निर्माण झाली असून कालच्या हल्ल्याची प्रतिक्रिया एका मशिदीवर हातबाँब फेकण्यात झाल्याचे वृत्त आहे. संपूर्ण पॅरीसमध्ये प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून हल्ल्यामध्ये सहभागी असलेले सगळे दहशतवादी पकडले जाईपर्यंत शहरात तणावाचे वातावरण राहण्याची चिन्हे आहेत.