पाकिस्तानमध्ये बाचा खान युनिव्हर्सिटीत दहशतवादी हल्ला,२१ ठार
By Admin | Updated: January 20, 2016 13:50 IST2016-01-20T11:26:46+5:302016-01-20T13:50:24+5:30
पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील बाचा खान विद्यापीठावर दहशतवाद्यांनी बुधवारी केलेल्या हल्ल्यात २१ जण ठार तर शेकडो जखमी झाले आहेत.

पाकिस्तानमध्ये बाचा खान युनिव्हर्सिटीत दहशतवादी हल्ला,२१ ठार
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. २० - पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील बाचा खान विद्यापीठावर दहशतवाद्यांनी बुधवारी हल्ला चढवला असून त्यात २१ जण ठार तर शेकडो विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे गेल्या वर्षी पेशावरमधील लष्कराच्या शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या ज्यात १३४ विद्यार्थी प्राणास मुकले होते.
धुक्याचा फायदा घेत तीन बंदूकधारी बुधवारी सकाळी विद्यापीठाच्या आवारात घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेत आत्तापर्यंत एका शिक्षकासह ४ जण मृत्यूमुखी पडले असून ५० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर पाकिस्तानी जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात आत्तापर्यंत २ दहशतवादी ठार झाल्याचे समजते. दहशतवादी व लष्कराचे जवान यांच्यात अद्याप चकमक सुरू असून विद्यापीठाच्या आवारातून २-३ स्फोटांचे आवाजही आल्याचे वृत्त आहे.
बाचा खान हे वायव्य पाकिस्तानच्या चारसड्डा परिसरात आहे. या विद्यापीठात आज कविसंमेलनाचे आजोजन करण्यात आले होते, ज्यास उपस्थित राहण्यासाठी अनेक पाहुणे व ६०० हून अधिक विद्यार्थी विद्यापीठात उपस्थत होते. याच कार्यक्रमाच्या लगबगीचा व परिसरातील दाट धुक्याचा फायदा घेत हे दहशतवादी विद्यापीठाच्या आवारात घुसले व त्यांनी डाव साधला.
काही विद्यार्थी दहशतवाद्यांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी ठरले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार तर केलाच पण काही विद्यार्थ्यांच्या सरळ डोक्यातच गोळ्या झाडल्या.
दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध नोंदवला असून निष्पाप विद्यार्थी व नागरिाकांचा जीव घेणा-यांचा कोणताच धर्म नसतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.