इस्लामाबाद: अण्वस्त्रे प्रदर्शनासाठी ठेवली नसल्याची फुशारकी मारत युद्धखोरीची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने नमते घेतले आहे. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सपशेल नांगी टाकत भारताविरोधात पहिल्यांदा अण्वस्त्रे वापरणार नसल्याचे म्हटले आहे.
भारताने नुकताच जम्मू आणि काश्मीरचे कलम 370 रद्द करत विशेष दर्जा काढून घेतला आहे. यावरून पाकिस्तानचा जळफळाट झाला असून प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्ये केली जात होती. यामुळे दोन्ही देशांदरम्यान तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर पोखरण येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत प्रथम अण्वस्त्रे वापरणार नसल्याचे म्हटले होते. यावरून पाकिस्तानने त्यांचे वक्तव्य युद्धाला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला होता. मात्र, यानंतर काही दिवसांतच पाकिस्तानच्या पंतप्रधानांवरच राजनाथ सिंहांचे वाक्य म्हणण्याची वेळ आली आहे.
इम्रान खान यांनी गेल्या शुक्रवारीच भारताला अण्वस्त्र युद्धाची धमकी दिली होती. अण्वस्त्र संपन्न दोन्ही देशांचे युद्ध झाले तर त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील अशी, धमकी दिली होती. तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर आम्ही त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत असा इशाराही त्यांनी भारताला दिला होता.
आज इम्रान खान यांच्या बोलण्याचा नुरच पालटलेला दिसला. लाहोर येथील शीख बांधवांना संबोधित करताना त्यांनी जर तणाव वाढला तर जग धोक्यात येईल, यामुळे पाकिस्तान प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नसल्याचे म्हटले.