१२ दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान बंदी घालणार
By Admin | Updated: January 16, 2015 05:28 IST2015-01-16T05:28:18+5:302015-01-16T05:28:18+5:30
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानचे कान पिळून सर्व दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे आदेश देताच,

१२ दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान बंदी घालणार
इस्लामाबाद : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकिस्तानचे कान पिळून सर्व दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे आदेश देताच, पाक सरकार हलू लागले असून, मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद याची जमात उद दवा ही संघटना (जेयूडी) तसेच अफगाणमधील हक्कानी नेटवर्क यांच्यासह १२ दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची तयारी पाकिस्तानात सुरू झाली आहे.
पेशावर येथील लष्करी शाळेवर झालेल्या हल्ल्यात १३२ मुलांसह १५० जण ठार झाल्यानंतर पाकचे सुरक्षा धोरण बदलले आहे. त्यातच अमेरिकन मंत्री जॉन केरी बुधवारी दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकला हे पाऊल उचलणे भाग पडले आहे.
पाकिस्तानी दहशतवादी संघटना तेहरिक- ए- तालिबान पाकिस्तानचा प्रमुख मुल्ला फजलुल्ला हा जागतिक दहशतवादी असल्याची घोषणा अमेरिकेने केली आहे. केरी यांचा पाकिस्तान दौरा आटोपताच अमेरिकेने हे जाहीर केले.
त्यानंतर पाकने १२ दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून, अशा आशयाची घोषणा येत्या काही दिवसांत होईल, असे ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने अधिकृत सूत्रांचा हवाला देऊन म्हटले
आहे.
हक्कानी नेटवर्क हे जलालुद्दीन हक्कानी याने स्थापन केले असून, या संघटनेवर २००८ साली अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासावर हल्ला (५८ ठार) व काबूल येथील अमेरिकन दूतावासावर हल्ला करणे तसेच ट्रक बॉम्बचा स्फोट घडवून आणणे असे आरोप
आहेत.
पाकिस्तानी गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केरी येण्याआधीच पाकिस्तानने १२ नव्या दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे. या संघटनांवर बंदी आणल्यास पाकिस्तानात बंदी घातलेल्या संघटनांचा आकडा ७२ पर्यंत पोहोचतो.