Pakistan UNSC: दहशतवाद्यांना पोसणारा पाकिस्तान आता संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणार आहे. याचे कारण म्हणजे, पाकिस्तानने 1 जानेवारी 2025 पासून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) स्थायी सदस्य म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ सुरू केला आहे. याबाबत पाकिस्तानचे राजदूत म्हणाले की, सुरक्षा परिषदेत संपूर्ण जगाला आमची उपस्थिती महत्वाची वाटेल. आम्ही जगासमोरील महत्त्वाच्या आव्हानांना सक्रिय आणि रचनात्मक पद्धतीने तोंड देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू.
पाकिस्तान आठव्यांदा सुरक्षा परिषदेचा सदस्य पाकिस्तान 2025-26 या कालावधीसाठी सुरक्षा परिषदेचा सदस्य असेल. या महत्त्वाच्या संस्थेत पाकिस्तानला स्थान मिळण्याची ही आठवी वेळ आहे. यापूर्वी 2012-13, 2003-04, 1993-94, 1983-84, 1976-77, 1968-69 आणि 1952-53 मध्ये पाकिस्तानने UNSC चे सदस्यत्व भूषवले होते.
जून 2024 मध्ये पाकिस्तानची या पदावर प्रचंड बहुमताने निवड झाली. पाकला संयुक्त राष्ट्र महासभेच्या 193 सदस्यांपैकी 182 मते मिळाली. हे दोन तृतीयांश बहुमत (124 मते) पेक्षा खूप जास्त होते.
महत्त्वाची भूमिका बजावण्याचा दावापाकिस्तानचे राजदूत पुढे म्हणतात, आम्ही अशा वेळी सुरक्षा परिषदेचा भाग बनत आहोत, जेव्हा संपूर्ण जगात भू-राजकीय अशांतता पसरली आहे. मोठ्या शक्तींमधील तीव्र स्पर्धा आणि युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि इतर प्रदेशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पाचव्या क्रमांकाचा देश असलेला पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरनुसार युद्धे रोखण्यासाठी, विवादांचे शांततापूर्ण निराकरण आणि दहशतवादासारख्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय आणि रचनात्मक भूमिका बजावेल.
पाकिस्तानसोबतच डेन्मार्क, ग्रीस, पनामा आणि सोमालिया हे देशही जून 2024 च्या सर्वसाधारण सभेच्या निवडणुकीत स्थायी सदस्य म्हणून निवडून आले. या देशांनी जपान, इक्वेडोर, माल्टा, मोझांबिक आणि स्वित्झर्लंडची जागा घेतली आहे.