Pakistan Terrorism: पाकिस्तानमधीलदहशतवादाबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने जाहिरपणे कबूल केले की, दिल्ली आणि मुंबई हल्ल्यांमागे जैश प्रमुख मसूद अझहरचा हात होता. यावेळी त्याने पाकिस्तानातील बालाकोट आणि बहावलपूरमधील जैशच्या ठिकाणांचाही उल्लेख केला आणि सांगितले की, याच ठिकाणांहून दहशतवादी हल्ल्यांच्या योजना आखण्यात आल्या.
पाकिस्तानी आर्मीचा थेट संबंध?
दहशतवादी इलियास काश्मिरीने त्याच्या कबुलीजबाबात पाकिस्तानी सरकारचा खरा चेहरा जगासमोर आणला. त्याने खुलासा केला की, बहावलपूरमधील जैश कॅम्पमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्याचे आदेश थेट पाकिस्तानी लष्करप्रमुखाने दिले होते. याशिवाय, DG ISPR (Inter-Services Public Relations) यांनी बहावलपूर आणि जैश-ए-मोहम्मद यांच्यातील दुवे लपवण्याचा प्रयत्न केला होता, असा दावाही करण्यात आला आहे.
ऑपरेशन ‘सिंदूर’नंतर दहशतवाद्यांमध्ये भीती
कमांडरच्या कबुलीजबाबातून आणखी एक मोठा मुद्दा समोर आला आहे. ऑपरेशन ‘सिंदूर’ नंतर दहशतवादी गटांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. कश्मिरीने सार्वजनिक व्यासपीठावरून ‘मिशन-ए-मुस्तफा’ साठी विविध दहशतवादी संघटनांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. काहींनी जिहाद नाकारला आहे, पण मी उरलेल्यांना घेऊन पुन्हा जिहाद जिवंत ठेवणार आहे, अशी घोषणा त्याने केली.
मसूद अझहरच्या कुटुंबाचे तुकडे झाले
याशिवाय, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बहावलपूरमध्ये भारताने केलेल्या स्ट्राईक दरम्यान दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचे 'तुकडे-तुकडे' झाले, अशी माहितीही इलियास काश्मिरीने दिली आहे. यावेळी त्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा उल्लेख करत म्हटले की, अल-जिहादची आवाज नेतन्याहूपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याचबरोबर लोकांनी जिहाद जिवंत ठेवण्यासाठी हात वर करून नारे द्यावेत, असे आवाहनही त्याने केले.
कोण आहे मसूद अझहर?
मसूद अजहर हा जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आणि प्रमुख असून, भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचा हात आहे. २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते. तरीही पाकिस्तानने त्याला थेट अटक करण्याऐवजी संरक्षण दिले, असा भारताचा सातत्याने आरोप आहे. आता त्याच्या स्वतःच्या संघटनेतील कमांडरकडून असा कबुलीजबाब आल्यानंतर पाकिस्तानच्या भूमिकेबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.