२००८ साली २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा भारतामध्ये दाखल झाला आहे. अमेरिकेतील प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा एनआयए आणि आणि गुप्तचर संस्था रॉचं संयुक्त पथक तहव्वूर राणाला घेऊन विशेष विमानाने भारतात आले. दरम्यान, आता पाकिस्तानने हात झटकण्यास सुरूवात केली आहे.
पाकिस्तानने राणासोबत काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, "तहव्वूर राणा याने गेल्या दोन दशकांत त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचे नूतनीकरण केलेले नाही. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तो आता कॅनेडियन नागरिक आहे."
२००८ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यातील कट रचल्याचा राणा हा मुख्य आरोपी मानला जातो. अमेरिकेतून प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला भारतात आणले आहे. तहव्वूर राणाला दिल्लीतील तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल. यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.
१६६ जणांनी जीव गमावला होता
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि शेकडो जण जखमी झाले. या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा असल्याचे म्हटले जात होते आणि राणावर हल्ल्याच्या नियोजनात मदत केल्याचा आरोप आहे.
राणाच्या चौकशीद्वारे, भारत आता त्या कटात कोण कोण सहभागी होते याचा तपास करु शकते. यामध्ये पाकिस्तानची भूमिका संशयास्पद आहे.