पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर मदतीसाठी याचना करताना दिसत आहे. भारतासोबतचा वाढता तणाव कमी करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती पाकिस्तानच्या अमेरिकेतील राजदूतांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली आहे. एवढेच नाही तर, आपली भारतासाख्या मोठ्या देशासोबत लढाई करण्याची इच्छा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या सहकारी दहशतवादी संघटने टीआरएफने केला होता.
अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत रिझवान सईद शेख यांनी 'न्यूजवीक'ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून उद्घाटन भाषणात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, "एक शांतिदूत आणि एकात्मता निर्माण करणारा, असा माझा अभिमानाचा वारसा असेल. ट्रम्प निवडून आल्यानंतर, इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी झाली होती. आता त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. याशिवाय, ते युक्रेन आणि रशिया युद्ध थांबवण्यासाठीही चर्चा करत आहेत.
मला वाटते, आपण ज्या धोक्यांचा सामना करत आहोत, ते पाहता, केवळ तत्काळ डी-एस्केलेटरी उपायांवर लक्ष केंद्रित करणे नव्हे, तर या स्थितीला संबोधित करण्याची ही एक संधी आहे. आमची लढाई करण्याची इच्छा नाही. विशेषः एखाद्या मोठ्या देशासोबत. आम्हाला शांतता हवी आहे. हे आमच्या आर्थिक अजेंड्याला अनुकूल आहे. हे आमच्या राष्ट्रवादाला अनुकूल आहे. हे आमच्या प्रत्येक उद्दिष्टासाठी अनुकूल आहे. मात्र, आम्हाला ससन्मान शांतता हवी आहे."