पाकिस्तानने लख्वीच्या पुन्हा मुसक्या बांधल्या
By Admin | Updated: December 30, 2014 23:49 IST2014-12-30T23:49:41+5:302014-12-30T23:49:41+5:30
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याला मंगळवारी सहा वर्षांपूर्वीच्या एका अपहरण प्रकरणात अटक करण्यात आली.

पाकिस्तानने लख्वीच्या पुन्हा मुसक्या बांधल्या
इस्लामाबाद : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याला मंगळवारी सहा वर्षांपूर्वीच्या एका अपहरण प्रकरणात अटक करण्यात आली. त्यामुळे त्याची सुटका टळली. सार्वजनिक सुरक्षा कायद्याखालील त्याची स्थानबद्धता पाकिस्तानी न्यायालयाने सोमवारी निलंबित केल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता. यावरून भारताने खडे बोल सुनावल्याच्या पार्श्वभूमीवर पाकने लख्वीचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद केला.
सुटका होण्यापूर्वीच लख्वीला मोहंमद अन्वर नामक एका व्यक्तीचे अपहरण केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.
यासंदर्भातील प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) सोमवारी इस्लामाबाद येथील पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मुंबई हल्ल्याप्रकरणी लख्वीविरुद्ध ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत एका न्यायालयाने त्याला १८ डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला होता.
पेशावरमध्ये शाळेवर हल्ला होऊन काही दिवस उलटत नाही तोच मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराला जामीन मिळाल्यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी भूमिकेवरच प्रश्नचिन्ह लागले होते. भारतासह जगभरातून पाकिस्तानवर टीका झाली होती. त्यामुळे पाक सरकारने सार्वजनिक सुरक्षा अबाधित राखण्याच्या आदेशातहत (एमपीओ) त्याला तीन महिन्यांसाठी स्थानबद्ध केले होते. त्यानंतर लख्वीने एमपीओखालील आपल्या स्थानबद्धतेस इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
उच्च न्यायालयाने सरकारी वकिलाच्या अनुपस्थितीत लख्वीच्या आव्हान याचिकेवर सुनावणी करताना एमपीओखाली त्याला स्थानबद्ध करण्याची सरकारची अधिसूचना निलंबित करून सुटकेसाठी त्याला दहा लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरण्याचे आदेश दिले होते. या घडामोडीवर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. (वृत्तसंस्था)
४लख्वीवर अपहरणाचा आरोप ठेवण्यात आल्यानंतर त्याला रावळपिंडी येथील अदियाला कारागृहातून बाहेर काढून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर लख्वीला अज्ञात ठिकाणी नेण्यात आले.
४लख्वीविरुद्ध गोलरा पोलीस ठाण्यात काल अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणावरून आम्ही त्याला त्या पोलीस ठाण्यात ठेवू शकत नाही, असे पाकिस्तानच्या गृहमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
झकी-उर-रहमान लख्वीला न्यायालयातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अज्ञात ठिकाणी हलविण्यात आले.