इस्लामाबाद - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा थयथयाट झाल्याचं दिसून येते. भारताचे आरोप नाकारत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली. त्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार आहे असं सांगत भारताला पोकळ धमकीही दिली आहे.
शहबाज शरीफ म्हणाले की, भारताने आरोप-प्रत्यारोपाचा खेळ बंद करावा. भारताच्या कुठल्याही हल्ल्याला आम्ही ताकदीने उत्तर देऊ. पाकिस्तानला शांतता हवी परंतु आम्ही शांत आहोत म्हणजे कमकुवत समजू नका. जर भारताने सिंधु नदीचं पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही त्याला ताकदीने प्रत्युत्तर देऊ. पहलगाम हल्ल्याच्या तटस्थ चौकशीला आम्ही तयार आहोत. परिस्थिती काहीही असली तरी आम्ही सन्मानाशी तडजोड करणार नाही असं त्यांनी म्हटलं. पाकिस्तानी सैन्य प्रमुखासमोर त्यांनी हे विधान केले.
तसेच आम्ही पूर्ण तयारनिशी आहोत. त्यामुळे कुणीही काही चूक करू नका. २४० मिलियन लोक देशात आहेत. आम्ही आमचे शूर लोक सशस्त्र दलांच्या मागे आहेत. हा संदेश मोठ्याने आणि स्पष्ट असायला हवा. आम्ही आमच्या अखंडतेशी आणि सुरक्षेशी तडजोड करणार नाही असंही पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.
आम्ही पारदर्शक, विश्वासार्ह चौकशीला तयार
पहलगाममधील अलिकडची दुर्घटना ही या सततच्या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळाचे आणखी एक उदाहरण आहे, जी आता थांबली पाहिजे. एक जबाबदार देश म्हणून आम्ही आमची भूमिका कायम ठेवतो. पाकिस्तान कोणत्याही तटस्थ, पारदर्शक आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे असं पाक पंतप्रधान म्हणाले.
सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर...
दरम्यान, पाकिस्तानातील माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तोंनी सिंधू नदीतून पाणी वाहिले नाही, तर भारताचे रक्त वाहणार, अशी धमकी दिली आहे. सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहणार. "जी घटना काश्मीरमध्ये झाली आणि भारताने पाकिस्तानवर आरोप केले आहेत. भारताने आपल्या उणीवा लपवण्यासाठी, त्यांच्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी पाकिस्तानवर खोटे आरोप केलेत. सिंधू आमची आहे आणि आमचीच राहणार. एकतर या नदीतून आमचे पाणी वाहणार नाही, तर त्यांचे रक्त वाहणार" अशी मुक्ताफळे बिलावल यांनी उधळली आहेत.