भारताने नुकतीच आपली 'अग्नि-५' आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यशस्वीरित्या चाचणी केल्यानंतर, पाकिस्तानने संपूर्ण देशभरातील अनेक महत्त्वाचे हवाई मार्ग तात्पुरते बंद केले आहेत. या निर्णयामुळे पाकिस्तान लवकरच मोठी क्षेपणास्त्र चाचणी किंवा हवाई संरक्षण लष्करी सराव करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारताने आपल्या स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रमाची यशस्वी चाचणी साजरी केली असतानाच, पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ही पाकिस्तानची असुरक्षितता आणि घाबरून केलेली प्रतिक्रिया मानली जात आहे.
पाकिस्तानकडून हवाई क्षेत्रावर बंदीपाकिस्तानने जारी केलेल्या नोटम (NOTAM) नुसार, २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ००.०० ते ०२.३० (UTC) या वेळेत इस्लामाबाद आणि नियंत्रण रेषेच्या जवळचे हवाई क्षेत्र बंद राहील. या काळात कोणत्याही व्यावसायिक विमानांना या मार्गांवरून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
त्याचप्रमाणे, दक्षिणी भागातील लाहोर, रहिमयार खान, कराची आणि ग्वादर पर्यंतचे महत्त्वाचे हवाई मार्ग २६ ऑगस्ट 2025 रोजी 00:30 (UTC) पर्यंत बंद राहतील. या बंदीचा थेट परिणाम भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ आणि अरबी समुद्रावरून उडणाऱ्या विमानांवरही होणार आहे. सूत्रांनुसार, पाकिस्तानचा हा निर्णय संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी किंवा हवाई संरक्षण सरावाचा भाग असू शकतो.
'ऑपरेशन सिंदूर' वेळीही लादली होती बंदी!यापूर्वी, २३ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावादरम्यानही पाकिस्तानने हवाई क्षेत्रावर बंदी घातली होती. त्यानंतर, ७ मे रोजी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, ज्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते.
त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतावर हल्ले केले, ज्यांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशांमध्ये चार दिवस संघर्ष सुरू राहिला आणि त्यानंतर युद्धविराम झाला. मात्र, पाकिस्तानने अद्याप आपल्या हवाई क्षेत्रावरील बंदी पूर्णपणे हटवलेली नाही. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये सादर केलेल्या आकडेवारीनुसार, या बंदीमुळे दोन महिन्यांत पाकिस्तानला सुमारे ४.१० अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानुसार, हे नुकसान २४ एप्रिल ते ३० जून २०२५ या काळात झाले.