इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळलेली असून, रोख रकमेचा मोठा तुटवडा निर्माण झाला आाहे. त्यातच बेरोजगारीचा दरही १.५ टक्क्यावरून ७ टक्क्यांवर गेला आहे. इतकी वाइट स्थिती असताना पाकिस्तानचे नशीब सध्या फळफळले आहे. पाकिस्तानच्या अटक शहरात तब्बल १७ हजार कोटी रुपये किमतीचा सोन्याचा साठा सापडला आहे. ३२ किलोमीटर परिसरात ३२६५८ किलो (२८ लाख तोळे) सोने सापडल्याचा दावा पाकिस्तानातील पंजाब राज्याचे माजी खाण मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी केला आहे. यामुळे देशाच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे ते म्हणाले.
८०० अब्ज रुपयांचा साठा, देशाच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते इब्राहिम हसन मुराद यांनी एक पोस्ट केली आहे. त्यानुसार पाकिस्तानच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या शास्त्रज्ञांनी केलेला हा शोध पंजाबमधील नैसर्गिक संसाधनांच्या प्रचंड साठ्यावर प्रकाश टाकतो. पथकाने या ठिकाणाहून १२७ ठिकाणचे नमुने घेतले. हा शोध पाकिस्तानची खनिज संपत्ती समोर येण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करताना भावी पिढ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाकिस्तानी चलनात या सोन्याची किंमत ८०० अब्ज रुपये इतकी आहे. यामुळे देशाच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते.
नोकरी हवी तर महागाई कमी करानियोजन आयोगाच्या शिफारशींनुसार बेरोजगारीचा दर कमी करण्यासाठी महागाई किमान ६ टक्क्यांच्या खाली असणे आवश्यक आहे. मात्र येथील महागाईचे आकडे दरवर्षी वाढत असून, यंदाही या महागाईत ३.९७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. साखरेच्या किमती सलग पाचव्या आठवड्यात वाढल्या आहेत. शिवाय, १८ जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांवर मोठे आर्थिक संकट आले आहे.
दरवर्षी ५ लाख लोक गरिबीत, नोकऱ्यांची गरजपाकिस्तानच्या जीडीपीचा विकास दर देशातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरा आहे. सध्या पाकिस्तानमध्ये बेरोजगारीचा दर भारत आणि बांगलादेशपेक्षा जास्त आहे. येथे महिलांना नोकरीच्या संधी मिळवण्यात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. लोकसंख्येच्या वाढीमुळे आरोग्य, शिक्षण आणि इतर आवश्यक गरजांशी संबंधित समस्या सोडवणे कठीण झाले असून, दरवर्षी ५ लाख लोक गरिबीत जात असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. पाकिस्तानला रोजगाराच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दरवर्षी १.५ दशलक्ष नोकऱ्यांची आवश्यकता आहे.