पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सीमापार दहशतवादावरून पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. यावेळी भारतानेपाकिस्तानला प्रत्युत्तर देताना एका पाठोपाठ एक अशा अनेक कारवाया केल्या. दरम्यान, गुरुवारी भारतीय नौदलानेही अरबी समुद्रातील आपल्या हलचाली तीव्र केल्या आहेत. यापूर्वी, भारतीय हवाई दलानेही राफेल आणि सुखोई विमानांसह 'आक्रमण' नावाने सराव करून पाकिस्तानची झोप उडाली होती. भारताच्या या कृतींमुळे, भारत आपल्यावर केव्हाही हल्ला करू शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. या भीतीपोटी पाकिस्तानने PoK मधील एक हजाराहून अधिक मदरसे बंद केले आहेत.
माध्यमांतील वृत्तांनुसार, पाकव्याप्त काश्मीरातील (पीओके) अधिकाऱ्यांनी गुरुवारी मदरसे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पीओकेच्या धार्मिक व्यवहार विभागाचे प्रमुख हाफिज नझीर अहमद म्हणाले, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काश्मिरातील सर्व मदरशांना १० दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे."
अनेक जिल्ह्यांमध्ये भीतीचं वातावरण -एएफपीने एका वृत्तात म्हटले आहे की, विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवरील तणाव आणि युद्धाची शक्यता लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुझफ्फराबादमधील आपत्कालीन कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, भारताने हल्ला केल्यास काय करावे? यासंदर्भात कर्मचारी शालेय मुलांना प्रशिक्षणही देत आहेत.