इस्लामाबाद - अलीकडच्या काळात ज्या अमेरिकेचे गुणगान करताना पाकिस्तान थकत नव्हता. आता त्यांच्याच विरोधात पाकिस्तान बोलत आहे. पाकिस्तानी संसदेत संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेले विधान व्हायरल झाले आहे. ज्यात अमेरिकेचे काळे कारनामे उघड करत टार्गेट केले आहे. नुकतेच भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाला. त्याचवेळी पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी अमेरिकेच्या विरोधात सूर आवळले आहेत.
पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत म्हटलं की, अमेरिकेने नेहमीप्रमाणे पाकिस्तानचा वापर करण्याचं काम केले. अफगाणिस्तान युद्धात आमचा वापर केला गेला आणि काम झाल्यावर सोडून दिले. तालिबानने जिहादच्या नावाखाली जेव्हा रशियाविरोधात युद्ध पुकारले तेव्हा आम्हीही युद्धात उतरलो परंतु त्याचे काही निमित्त नव्हते कारण हा जिहाद नव्हता. रशियाने अफगाणिस्तानवर कब्जा केला नव्हता असं त्यांनी सांगितले.
२००१ साली अमेरिकेसाठी तालिबानविरोधात जात पाकिस्तानने पुन्हा चूक केली. अमेरिका बाजूला झाली परंतु आम्ही आतापर्यंत त्याचे नुकसान भोगत आहे. त्याची भरपाई कधीही होऊ शकत नाही. पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल जियाउल हक आणि परवेज मुशर्रफ यांनाही संरक्षण मंत्र्यांनी टार्गेट केले. अफगाणिस्तानात १९८० साली जो विद्रोह झाला तो अमेरिकेच्या इशाऱ्यावर करण्यात आला होता. पाकिस्तानच्या तेव्हाच्या सरकारने स्वत:च्या फायद्यासाठी आपल्याच लोकांना त्यात सहभागी करून मोठी चूक केली होती असंही ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं.
दरम्यान, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची ही विधाने अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणल्याचे आणि अफगाणिस्तानसोबत दिर्घकाळ संघर्ष यातून समोर आले आहे. पाकिस्तानने अमेरिकेसाठी काय काय केले नाही, पोर्टपासून एअरस्पेस दिले. जे अफगाणिस्तानच्या युद्धात कामाला आले. परंतु अमेरिकेने पाकिस्तानचा वापर केल्यानंतर टॉयलेट पेपरसारखे फेकून दिले असंही ख्वाजा आसिफ यांनी संसदेत सांगितले.