Pakistan killed Taliban TTP terrorits: पहलगाम दहशतावादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानचे कनेक्शन समोर येताच भारताने कठोर पावले उचलली. पाकिस्तानची राजकीय आणि तांत्रिक स्तरावर कोंडी करण्याचा प्रयत्न भारताने सुरु केला आहे. यादरम्यान, पाकिस्तानचे अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून येताना दिसत आहेत. भारत (India) पुन्हा एकदा एअरस्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईक करेल या भीतीने पाकिस्तान भलतेच अलर्ट मोडवर आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानने आणीबाणीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे मंत्री बेताल विधाने करत सुटले आहेत. त्यातच आता पाकिस्तानने खैबर पख्तुनख्वा प्रांतात ५४ टीटीपी समर्थकांना ठार केले आहे. हे लोक अफगाणिस्तानातून पाकिस्तानात घुसखोरीचा प्रयत्न करत असताना त्यांना मारण्यात आले.
पाकिस्तानच्या लष्कराच्या माहितीनुसार, ही घटना अफगाणिस्तानच्या सीमेवरील खैबर पख्तूनख्वा प्रांताचा भाग असलेल्या उत्तर वझिरिस्तानजवळ घडली. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारे अशांत असलेल्या भागात हे 'बंडखोर' दिसले आणि त्यानंतर त्यांना मारण्यात आले. लष्कराने असाही दावा केला आहे की मारले गेलेले टीपीपी समर्थक म्हणजेच 'ख्वारिज' होते. हा शब्द पाकिस्तानी तालिबान (टीटीपी) साठी वापरला जातो.
कोणत्याही देशाचे नाव न घेता, लष्कराने आरोप केला की या 'बंडखोरांना' त्यांच्या 'परदेशी आकांनी' पाकिस्तानमध्ये हाय-प्रोफाइल दहशतवादी हल्ले करण्यासाठी पाठवले होते. पाकिस्तानचा आरोप आहे की पाकिस्तानमधील तालिबानशी संबंधित गटांची सहयोगी मानली जाणारी 'अफगाण तालिबान' संघटना या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देत आहे.
दरम्यान, पाकिस्तानी तालिबान हे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या नावाने कार्यरत आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सरकार स्थापन झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या कारवाया अधिक तीव्र केल्या. टीटीपी हा अफगाण तालिबानचा समर्थक असल्याचे मानले जाते आणि पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानी सैन्याने डेरा इस्माईल खान शहरातील एका ठिकाणावर छापा टाकताना 'ख्वारिज' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नऊ अतिरेक्यांना ठार मारले.