पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा बळी गेल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या हल्ल्याचा बदला घेतला, ज्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या घटनेनंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केली आहेत. मुनीर यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांना 'वैध संघर्ष' म्हटले आहे.
मुनीर यांचे चिथावणीखोर भाषणआसिम मुनीर यांनी कराची येथील पाकिस्तानी नौदल अकादमीतील पासिंग आउट परेडमध्ये बोलताना काश्मीर आणि दहशतवादाबाबत अनेक आक्षेपार्ह विधाने केली. मुनीर म्हणाले की, "भारत ज्याला दहशतवाद म्हणतो, तो एक वैध संघर्ष आहे. पाकिस्तान नेहमी काश्मिरींच्या पाठीशी उभा राहील." त्यांनी पुढे असेही म्हटले की, "जर भारताने भविष्यात हल्ला केला, तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल. आम्ही हे दोनदा करून दाखवले आहे – २०१९ मध्ये बालाकोट हवाई हल्ला आम्ही अयशस्वी केला, आणि आता ऑपरेशन सिंदूरलाही प्रत्युत्तर दिले."
भारत-पाकिस्तानमधील तणावऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले होते. या कारवाईनंतर पाकिस्तानी लष्कराने भारताच्या अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांना मोठे नुकसान पोहोचवले. यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीवर सहमती झाली होती.