पाकिस्तानमध्ये भीक मागणं हा सर्वात महत्वाचा व्यवसाय बनला आहे. पाकिस्तानची एकूण लोकसंख्या २३ कोटी आहे आणि त्यापैकी सुमारे ४ कोटी लोक भीक मागतात. म्हणजेच पाकिस्तानातील प्रत्येक सहावी व्यक्ती भीक मागते. पाकिस्तानी लोक केवळ त्यांच्या देशात भीक मागत नाहीत तर परदेशातही 'व्यवसाय' म्हणून हे काम करत आहेत. भिकाऱ्यांमुळे पाकिस्तान सरकारला त्यांची जागतिक प्रतिमा सांभाळणं अवघड होत आहे.
डॉनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानची लोकसंख्या २३ कोटी आहे, त्यापैकी ३.८ कोटी व्यावसायिक भिकारी आहेत. एका भिकाऱ्याचं राष्ट्रीय सरासरी उत्पन्न दररोज ८५० पाकिस्तानी रुपये आहे. या भिकाऱ्यांना दररोज ३२ अब्ज रुपये भीक मिळत असल्याचं म्हटलं जातं, जे दरवर्षी ११७ ट्रिलियन रुपये आहेत. अमेरिकन डॉलरमध्ये पाकिस्तानी भिकाऱ्यांचं वार्षिक उत्पन्न ४२ अब्ज डॉलर आहे.
३.८ कोटी लोक काहीही न करता दरवर्षी ४२ अब्ज डॉलर्स कमवत आहेत. याचा थेट परिणाम देशातील उर्वरित लोकसंख्येवर होत आहे आणि जे महागाई वाढण्या मागचं कारण आहे. पाकिस्तानमधील बिझनेस अँड सोसायटी सेंटरच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, देशात भीक मागण्याची प्रवृत्ती वाढत आहे कारण इतर कामापेक्षा जास्त कमाई करत आहे.
एशियन ह्युमन राईट्स कमिशन (AHRC) नुसार, पाकिस्तानच्या लोकसंख्येपैकी २.५ ते ११ टक्के लोक उपजीविका करण्यासाठी भीक मागत आहेत. एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या आकडेवारीनुसार, देशातील प्रमुख शहरी केंद्रांच्या रस्त्यावर सुमारे १२ लाख मुलं फिरतात.
पाकिस्तान सरकारने रस्त्यावर भीक मागण्यासाठी परदेशात जाणाऱ्या लोकांचा डेटा गोळा केला आहे. परदेशात पकडलेले ९० टक्के भिकारी पाकिस्तानी वंशाचे असल्याचं आकडेवारीवरून समोर आलं आहे. इराकी आणि सौदी राजदूतांनी याबद्दल पाकिस्तान सरकारकडे तक्रारही केली आहे.
पाकिस्तान सरकारने धार्मिक तीर्थयात्रेच्या नावाखाली आणि भीक मागण्याच्या नावाखाली सौदी अरेबिया, इराक आणि इराणसारख्या देशांमध्ये जाणाऱ्या हजारो भिकाऱ्यांचे पासपोर्ट निलंबित केले आहेत. गेल्या अडीच वर्षांत सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांमधून ४४,००० भिकाऱ्यांना पाकिस्तानला परत पाठवण्यात आलं आहे.