हफीजवर पाकने घातलेली बंदी खरी की खोटी?
By Admin | Updated: January 26, 2015 03:14 IST2015-01-26T03:14:30+5:302015-01-26T03:14:30+5:30
जमात उद दवा या संघटनेवर घातलेली बंदी व हफीज सईदवर परदेश प्रवासासाठी घातलेली बंदी खरी होती की ते निव्वळ नाटक होते असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हफीजवर पाकने घातलेली बंदी खरी की खोटी?
लाहोर : जमात उद दवा या संघटनेवर घातलेली बंदी व हफीज सईदवर परदेश प्रवासासाठी घातलेली बंदी खरी होती की ते निव्वळ नाटक होते असा प्रश्न निर्माण झाला आहे. जमात उद दवाची बँक खातीच नाहीत आणि हफीज सईदचा पासपोर्ट आधीच एक्सपायर झाला आहे, असे आता पाकिस्तानच्या गृहमंत्रालयातर्फे सांगितले जात आहे.
जमात उद दवा संघटनेची देशात बँक खाती नाहीत. २००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असणाऱ्या हफीज सईदचा पासपोर्ट सात वर्षांपूर्वीच एक्सपायर झाला आहे. २००६ साली हफीज सईद सौदी अरेबियाला हज यात्रेसाठी गेला होता, त्यानंतर तो परदेश प्रवासाला गेला नाही असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या तस्निमा अस्लम यांनी यासंदर्भात बोलताना पत्रकारांना असे सांगितले होते की ज्या संघटनांवर संयुक्त राष्ट्राची बंदी आहे अशा जमात उद दवा व आणखी काही संघटनांवर पाकने बंदी घातली आहे. जमात उद दवाची बँक खाती गोठविण्यात आली असून, हफीज सईदवर आंतरराष्ट्रीय प्रवास बंदी घातली आहे; पण हा निर्णय खोटा असावा असे आता वाटत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखविण्यासाठी पाकने बंदी घालण्याचे नाटक केले आहे, असे विश्लेषकांचे मत आहे.
जमात उद दवा ही समाजसेवी संघटना असून बंदीचा परिणाम या संघटनेवर होणार नाही असे हफीज सईद यासंदर्भात बोलतो आहे.
(वृत्तसंस्था)