फ्रांसमध्ये एका महिलेला तब्बल २० वर्षांपासून काम न करता पगार मिळत होता. अनेकांसाठी ही गोष्ट एखाद्या स्वप्नपूर्ती सारखी असू शकते. पण, त्या महिलेसाठी मात्र तो एक मानसिक छळ होता. त्यामुळे आता तिने कंपनीवरच खटला दाखल केला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, लॉरेन्स व्हॅन वासेनहोव्ह असं या ५९ वर्षीय महिलेचं नाव आहे. इतकी वर्षं विनाकारण पगार घेणं हे तिच्यासाठी एक दुःस्वप्न बनलं होतं, असं तिचं म्हणणं आहे.
लॉरेन्स व्हॅन वासेनहोव्ह यांनी युरोपमधील एका मोठ्या कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. कामाच्या ठिकाणी आपल्यावर भेदभाव झाला आणि गेल्या २० वर्षांपासून कोणतंच काम न देता आपल्याला बाजूला सारण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?१९९३मध्ये लॉरेन्स व्हॅन वासेनहोव्ह 'ऑरेंज' या कंपनीत एचआर असिस्टंट म्हणून रुजू झाल्या होत्या. पण काही वर्षांनी त्यांना एपिलेप्सी आणि हेमिप्लेजिया (शरीराच्या एका बाजूचा अर्धांगवायू) यांसारख्या आजारांनी ग्रासलं. या आजारांमुळे त्या कोणतंच काम करण्यास अक्षम होत्या. त्यामुळे कंपनीने त्यांना सेक्रेटरी म्हणून दुसऱ्या विभागात हलवलं. २००२मध्ये त्यांनी दुसऱ्या विभागात बदलीसाठी अर्ज केला, पण आरोग्याच्या कारणांमुळे त्यांना पात्र मानण्यात आलं नाही.
पगार मिळाला, पण शांतता नाही!लॉरेन्स यांना पगार मिळत होता, पण त्यांना अनेकदा कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जायच्या. यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. एका वृत्त वहिनीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "माझ्यासोबत एका बहिष्कृतासारखं वागण्यात आलं. घरी बसून पैसे मिळवणं हा काही विशेष अधिकार नाही, तर हा एक मानसिक त्रास आहे. मला माझ्या अस्तित्वालाच दुर्लक्षित केल्यासारखं वाटलं."
कंपनीचं स्पष्टीकरणयावर कंपनीनेही आपली बाजू मांडली आहे. 'ला डेपेचे' (La Dépêche) या फ्रेंच वृत्तसंस्थेशी बोलताना ऑरेंजने म्हटलं, की कंपनीने लॉरेन्सच्या वैयक्तिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार केला होता. कंपनीने त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी नवीन भूमिका देण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या सतत आजारपणामुळे सुट्टीवर होत्या, असा दावा कंपनीने केला आहे.