नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात कठोर निर्णय घेतलेत. सिंधु जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे. भारताच्या एका पाठोपाठ एक कारवाईमुळे पाकची झोप उडाली आहे त्यामुळेच पाकिस्तानी मंत्री अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री दीड वाजता पत्रकार परिषद घेतली. भारत पुढील २४ ते ३६ तासांत सैन्य हल्ला करू शकते अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्र्याचं हे विधान अशावेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद विरोधी लढाईत सैन्याला कारवाई करण्याची मुभा दिली आहे जेणेकरून पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल. पहलगामच्या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री तरार यांनी सोशल मिडिया X वर एक पोस्ट लिहून पाकिस्तानकडे विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळाल्याचा दावा केला आहे.
घाबरलेल्या पाकची पोकळ धमकी
भारत पहलगाम हल्ल्याच्या बहाण्यानं पुढील २४ ते ३६ तासांत पाकिस्तानवर सैन्य हल्ला करू शकते. आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तान स्वत: दहशतवादाचा बळी आहे त्यामुळे हे संकट आम्हाला समजते. आम्ही याचा कायम निषेध केला आहे. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी तज्ज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शी चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत असं सांगत मंत्री तरार यांनी जागतिक पातळीवर या स्थितीचं गांभीर्य ओळखून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तान कुठल्याही किंमतीत आमच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे असंही पाकिस्तानी मंत्री तरार यांनी म्हटलं.
दरम्यान, पाकिस्तानी संरक्षण मंत्री यांनीही भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानात हायअलर्ट असून देशाच्या अस्तित्वाला थेट धोका असेल तेव्हाच अण्वस्त्रांचा वापर केला जाईल असं मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी कडक शब्दात इशारा दिला होता. आम्ही दहशतवादी आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांना असा धडा शिकवू ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. ते जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात लपले असतील तरी आम्ही शोधून काढू असं मोदींनी इशारा दिला होता.