Bilawal Bhutto on Pahalgam Terrorist Attack: दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केल्यानंतर भारताने पाकिस्तानवर पहिला प्रहार केला तो सिंधू नदीचे पाणी रोखून! सिंधू जल करार बाजूला ठेवून भारताने पाणी रोखल्याने पाकिस्तानात थयथयाट सुरू झाला आहे. पाकिस्तानातील मंत्री आणि नेते भारताला धडा शिकवण्याची मुक्ताफळे उधळत आहेत. त्यात आता माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तोंनी सिंधू नदीतून पाणी वाहिले नाही, तर भारताचे रक्त वाहणार, अशी धमकी दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो एका कार्यक्रमात बोलताना भारताबद्दल गरळ ओकताना दिसत आहे. सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहणार असे म्हणत आहेत. सिंधू नदीच्या काठावर असलेल्या सखरमध्ये त्यांनी एका रॅलीत हे विधान केले.
बिलावल भुत्तो काय बोलले?
सखरमध्ये झालेल्या सभेत बिलावल भुत्तोंनी भारताविरोधात थयथयाट केला. ते म्हणाले, "जी घटना काश्मीरमध्ये झाली आणि भारताने पाकिस्तानवर आरोप केले आहेत. भारताने आपल्या उणीवा लपवण्यासाठी, त्यांच्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोदींनी पाकिस्तानवर खोटे आरोप केले आहेत."
"या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी घोषणा केली आहे. हा त्यांचा एकांगी निर्णय आहे की, जो सिंधू जल करार आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला; ज्या माध्यमातून भारताने हे मान्य केलेलं आहे की, सिंधू पाकिस्तानची आहे", असे भुत्तो म्हणाले.
सिंधू नदीतून पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त -भुत्तो
"मोदींनी आणि त्यांच्या सरकारने घोषणा केली की, आता कोणताही करार मानणार नाही. आणि मी सखलमध्ये, याच सिंधू नदीच्या काठावरून भारताला सांगू इच्छितो की, सिंधू आमची आहे आणि आमचीच राहणार. एकतर या नदीतून आमचे पाणी वाहणार नाही, तर त्यांचे रक्त वाहणार", अशी मुक्ताफळे बिलावल भुत्तोंनी उधळली.
"असे होऊ शकत नाही की, एक दिवस उठतील आणि निर्णय घेतील की, ते सिंधू जल करार मान्य करत नाही', असेही भुत्तो म्हणाले.