Operation Sindoor US Warfare Expert John Spencer: निवृत्त अमेरिकन लष्करी अधिकारी, आधुनिक युगातील युद्धजन्य परिस्थितीचे विश्लेषक आणि लेखक जॉन स्पेन्सर यांनी भारताच्याऑपरेशन सिंदूरचे तोंडभरून कौतुक केले आहे. एका एक्स पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, केवळ चार दिवसांच्या सुनियोजित लष्करी कारवाईनंतर भारताने निर्णायक विजय मिळवला आहे. दहशतवाद्यांचे तळ नष्ट करणे, लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करणे आणि राष्ट्रीय सुरक्षा धोरण दृढपणे राबवणे यात भारत पूर्णपणे यशस्वी झाला आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने ठरवलेल्यापेक्षा जास्त यश मिळवले आहे, असेही त्यांनी लिहिले.
जॉन स्पेन्सर यांनी अमेरिकन सैन्यात काम केले आहे. इराक युद्धात दोनदा त्यांना तैनात करण्यात आले होते आणि रेंजर स्कूलसारख्या संस्थांमध्येही त्यांनी काम केले आहे. संरक्षण रणनीतीची सखोल समज असलेल्यांमध्ये त्यांच्या विश्लेषणाला महत्त्वाचे मानले जाते.
भारताने हवाई संरक्षणात सामर्थ्यशाली चमक दाखवली- जॉन स्पेन्सर
फक्त चार दिवसांच्या कॅलिब्रेटेड लष्करी कारवाईनंतर हे वस्तुनिष्ठपणे निर्णायक ठरते की भारताने मोठा विजय मिळवला. ऑपरेशन सिंदूरने त्यांचे धोरणात्मक उद्दिष्टे पूर्ण केली आहेत आणि ठरवल्यापेक्षा जास्त यश मिळवले आहे. दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे, लष्करी श्रेष्ठता प्रदर्शित करणे आणि एक नवीन राष्ट्रीय सुरक्षा सिद्धांत कसा असावा हे त्यांनी दाखवून दिले आहे. ही प्रतीकात्मक शक्ती नव्हती. ही निर्णायक शक्ती होती, ज्याची स्पष्टपणे यशस्वी अमलबजावणी करण्यात आली," असे स्पेन्सर यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले.
जॉन स्पेन्सर यांच्यामते, हे ४ परिणाम साध्य झाले...
१. एक नवीन सीमारेषा आखली गेली आणि अंमलातही आणली गेली-पाकिस्तानी भूमीवरून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना लष्करी बळाचा वापर करून तोंड देण्यात आले. ही केवळ धमकी उरली नाही तर एक नवे उदाहरण सेट झाले.
२. लष्करी सामर्थ्याची श्रेष्ठता दाखवली- भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळे, ड्रोन सेंटर्स आणि हवाई तळ असे कोणत्याही लक्ष्यावर इच्छेनुसार हल्ला करण्याची क्षमता दाखवली. याउलट, पाकिस्तान भारतातील एकाही सुरक्षित व प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करू शकला नाही. भारत पाकिस्तानच्या वरचढ ठरला.
३. नियंत्रणाची क्षमता- भारताने जोरदारपणे प्रत्युत्तर दिले, परंतु पूर्ण युद्ध छेडण्यापूर्वी हल्ले थांबवले. नियंत्रित वाढत्या हल्ल्याने एक स्पष्ट प्रतिबंधक संकेत मिळाला की, भारत चोख प्रत्युत्तर देईल आणि त्याचा वेग भारताच्या नियंत्रणात असेल.
४. धोरणात्मक स्वातंत्र्याचा दावा- भारताने आंतरराष्ट्रीय मध्यस्थी न घेता हे संकट हाताळले असे सांगितले जाते. सार्वभौम मार्गांचा वापर करून आपल्या अटी-शर्तींवर भारताने या गोष्टींवर विजय मिळवला.