Operation Sindoor: भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनेपाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला मोठा तडाखा दिला. या लष्करी कारवाईत पाकिस्तानातील दहशतवादी पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाल्याची धक्कादायक कबुली खुद्द लष्कर-ए-तोयबाच्या एका बड्या नेत्याने दिली आहे. भारताने दहशतवादी तळांना लक्ष्य करून मोठी चूक केल्याची धमकी देत दहशतवादी नेत्याने आता भारताविरुद्ध गरळ ओकली आहे.
हाफिज सईदचा अत्यंत जवळचा मानला जाणारा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला कसूरी याने एका जाहीर सभेत भारताच्या कारवाईची कबुली दिली. "भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करून मोठी चूक केली आहे," असे म्हणत त्याने स्वतःच्याच पायाभूत सुविधा नष्ट झाल्याचे मान्य केले. हजारो समर्थकांसमोर बोलताना त्याने काश्मीर मिशनवरून मागे न हटण्याची दर्पोक्ती केली असून जगाला हादरवून सोडण्याची धमकी दिली आहे.
कसूरीने आपल्या भाषणात केवळ काश्मीरच नव्हे, तर अमृतसर, होशियारपूर, गुरुदासपूर, जुनागड, हैदराबाद आणि बंगाल हे भागही पाकिस्तानकडून हिरावून घेतल्याचा हास्यास्पद दावा केला आहे. कट्टरतावाद्यांना भडकवण्यासाठी त्याने या ऐतिहासिकदृष्ट्या चुकीच्या मुद्द्यांचा आधार घेत भारताविरुद्ध द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. "पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून माझे नाव आता जगभर गाजत आहे," असे म्हणत त्याने आपल्या गुन्ह्यांचे जाहीरपणे समर्थन केले.
'ऑपरेशन सिंदूर'चा थरार
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ ते १० मे दरम्यान ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी कॅम्प जमीनदोस्त करण्यात आले. यापैकी ७ तळांवर भारतीय भूदलाने, तर २ तळांवर हवाई दलाने अचूक प्रहार केला. नियंत्रण रेषेवर डझनभर दहशतवादी लाँच पॅड्स उद्ध्वस्त करून घुसखोरीचे मार्ग बंद केले. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने ड्रोनद्वारे हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण तो भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने यशस्वीरीत्या मोडून काढला. त्यानंतर १० मे रोजी पाकिस्तानच्या लष्करी मोहीम महासंचालकांनी भारताशी संपर्क साधून युद्धविराम आणि लष्करी कारवाई थांबवण्याची विनंती केली.
भारताची भूमिका स्पष्ट
भारताने जागतिक स्तरावर स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूर ही केवळ दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी केलेली एक प्रिसिजन ॲक्शन होती. ही कारवाई कोणत्याही नागरिक किंवा सरकारी मालमत्तेविरुद्ध नव्हती, तर भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरुद्ध होती. या कारवाईमुळे पाकिस्तानचे दहशतवादी जाळे पूर्णपणे विस्कळीत झाले असून, सैफुल्ला कसूरीसारख्या नेत्यांचा थयथयाट भारताच्या लष्करी यशाची पावती मानली जात आहे.
Web Summary : Lashkar-e-Taiba commander Saifullah Kasuri admitted India's Operation Sindoor destroyed their bases. He threatened retaliation while acknowledging the operation's impact. India clarified it targeted terrorist infrastructure, disrupting Pakistani networks after the Pahalgam attack response.
Web Summary : लश्कर-ए-तैयबा के कमांडर सैफुल्लाह कसूरी ने माना कि भारत के ऑपरेशन सिंदूर ने उनके ठिकानों को तबाह कर दिया। उसने जवाबी कार्रवाई की धमकी दी और ऑपरेशन के प्रभाव को स्वीकार किया। भारत ने स्पष्ट किया कि उसने आतंकवादी ढांचे को निशाना बनाया, जिससे पाकिस्तान के नेटवर्क बाधित हुए।