Indian Air Force Attack on Murid: पहलगाम हल्ल्यानंतर मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या ८८ तासांच्या युद्धात भारतीय हवाई दलाने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनेपाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. आता या हल्ल्याच्या सहा महिन्यांनंतरचे नवे हाय-रेझोल्यूशन सॅटेलाईट फोटो समोर आले असून, पाकिस्तान आपल्या एअरबेसवर झालेल्या प्रचंड नुकसानीवर पडदा टाकण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसत आहे.
मुरीद एअरबेसवर 'ताडपत्री'
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, १६ डिसेंबरच्या सॅटेलाईट फोटोंनुसार, पाकिस्तानच्या मुरीद एअरबेसवरील मुख्य कमांड अँड कंट्रोल इमारतीवर सध्या मोठ्या लाल रंगाच्या ताडपत्री टाकण्यात आली असून तिथे पुन्हा बांधकाम सुरु करण्यात आलं आहे. १० मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात या इमारतीचे छप्पर कोसळले होते आणि अंतर्गत भागाचे प्रचंड नुकसान झाले होते.
जून महिन्यात तिथे फक्त एका लहान हिरव्या ताडपत्रीने छिद्र झाकले होते, पण आता संपूर्ण इमारतच ताडपत्रीने झाकली आहे. सॅटेलाईटच्या नजरेपासून ढिगारा आणि अंतर्गत नुकसान लपवण्यासाठी पाकिस्ता अशा ताडपत्रींचा वापर करत असल्याचे समोर आलं आहे.
तज्ज्ञांच्या मते, भारतीय हवाई दलाने या हल्ल्यात रूफ-पेनिट्रेटिंग वारहेड्सचा वापर केला असावा. ही क्षेपणास्त्रे आधी इमारतीचे काँक्रीटचे छप्पर फोडून आत शिरतात आणि नंतर आतमध्ये स्फोट घडवून आणतात, ज्यामुळे इमारतीचा सांगाडा शाबूत दिसला तरी आतून सर्व भाग उद्ध्वस्त होतो.
ड्रोन युद्धाचे केंद्र लक्ष्य
मुरीद एअरबेस हा पाकिस्तानच्या अनमॅन्ड एरियल व्हेईकल आणि कॉम्बॅट ड्रोन मोहिमांचे मुख्य केंद्र आहे. येथे शहापर, बुर्राक, बायरक्तर टीबी २ आणि विंग लूंग २ सारखे प्रगत ड्रोन तैनात आहेत. भारताने याच केंद्रावर दोनदा हल्ला केला होता. दुसऱ्या हल्ल्यात एका भूमिगत तळाच्या प्रवेशद्वाराजवळ ३ मीटर रुंद खड्डा पडला होता, तिथे युद्धसामग्री साठवली गेली होती.
'ऑपरेशन सिंदूर' मधील मोठे यश
मे २०२५ च्या या ८८ तासांच्या युद्धात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या अनेक तळांचे नुकसान केले. जॅकोबाबाद एअरबेस येथे हँगर उद्ध्वस्त झाले असून भारताच्या दाव्यानुसार पाकिस्तानची अनेक एफ-१६ फायटर जेट्स जमिनीवरच नष्ट झाली. तर भोलारी एअरबेसच्या हँगरवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे अत्यंत महत्त्वाचे अर्ली वॉर्निंग विमान नष्ट झाले. मुशाफ आणि रहीम यार खान येथील धावपट्ट्यांवर भारताने भगदाडे पाडल्याने पाकिस्तानी लढाऊ विमानांचे उड्डाणच बंद झाले होते. तर सुक्कुर एअरबेसवरील ड्रोन हँगर पूर्णपणे भुईसपाट करण्यात आले होते. नूर खान एअरबेसही पूर्णपणे नष्ट झाल्यात जमा होता.
९ मे रोजी पाकिस्तानने भारताच्या २६ ठिकाणांवर ड्रोन हल्ले केले होते, तसेच भारताच्या एस-४०० यंत्रणेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. याला उत्तर म्हणून १० मे रोजी भारतीय हवाई दलाने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या एअरबेसेसवर तुफान बॉम्बफेक केली. यानंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्तानच्या डीजीएमओनी भारताकडे सीझफायरसाठी विनवणी केली.
Web Summary : Pakistan is covering up damage from India's 'Operation Sindoor' air strikes. Satellite images show Murid Airbase's command building now concealed by tarpaulin after the May 2025 attack, which targeted drone operations and other key infrastructure.
Web Summary : पाकिस्तान भारत के 'ऑपरेशन सिंदूर' से हुए नुकसान को छुपा रहा है। सैटेलाइट तस्वीरों से पता चलता है कि मुरीद एयरबेस की कमांड बिल्डिंग को मई 2025 के हमले के बाद तिरपाल से ढका गया, जिसने ड्रोन संचालन और महत्वपूर्ण बुनियादी ढांचे को निशाना बनाया।